(रत्नागिरी)
ऐन गणशोत्सवात सीएनजीचा तुटवडा भासत असल्याने रिक्षा चालकांसह अन्य वाहनधारक आर्थिक गोत्यात आले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ही परिस्थिती आहे. जिल्ह्यात सीएनजीवर चालणारी अनेक वाहने आहेत. गॅस पंपावर उपलब्ध झाल्यानंतर तो भरण्यासाठी सीएनजी वाहनधारकांना दोन ते तीन तास रांगेत रहावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारक अडचणीत आल्याचे म्हणणे आहे.
चाकरमानी रत्नागिरीसह आजुबाजुच्या गावांत दाखल होत आहेत. रिक्षा किंवा छोट्या मोटार कार भाड्याने घेऊन आपापल्या गावी येत आहेत. हाच हंगाम रिक्षा व्यावसायिकांसाठी प्रवासी भाडे मिळण्याचा असतो. परंतु ज्या रिक्षा सीएनजीवर चालतात त्या रिक्षा चालकांना व्यवसाय करण्यात अडचणी येत आहेत. प्रत्येक घरात 1 ते 2 दुचाकी असल्याने रिक्षा व्यवसाय थंडावला आहे. तरीही सणासुदीच्या दिवसांसह गणेशोत्सवात चाकरमानी, पर्यटक रत्नागिरीत येतात तेव्हा रिक्षा व्यवसाय बऱ्यापैकी होतो.
सीएनजी मिळत नसल्याने सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. रत्नागिरीतील 2 ते 3 हजार रिक्षांचा समावेश आहे. रत्नागिरीत दोन-तीन दिवसांपासून सीएनजीची टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईचा रिक्षा व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.