(मुंबई)
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ‘परिशिष्ट-२’मध्ये (पात्रता यादी) झोपडीला पात्र करून घेण्यासाठी झोपडीधारकांकडे साडेसहा लाखांची लाच मागणाऱ्या म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी अटक केली. दिनेश श्रेष्ठ असे या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे.
श्रेष्ठ यांनी कंत्राटदार संजय त्रिवेदी आणि रिक्षा चालक राजकुमार यादव यांच्यामार्फत लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रस्तावित झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अभय योजनेंतर्गत आपले नाव परिशिष्ट २ मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी तक्रारदाराने भूव्यवस्थापकीय मंडळाकडे (बोरिवली विभाग) अर्ज केला होता.
लाचेचे दोन लाख घेतले
तक्रारदाराने झोपडी पात्र करण्यासाठी २७ जानेवारी रोजी म्हाडाचे कार्यकारी अभियंता दिनेश श्रेष्ठ यांची भेट घेतली. त्यांच्यासह आणखीन दहा झोपडीधारकही याच मागणीसाठी तेथे उपस्थित होते. अर्जावर सकारात्मक शेरा देण्यासाठी श्रेष्ठ यांनी प्रत्येक झोपडीधारकांकडे ६० हजार रुपयांप्रमाणे ६ लाख ६० हजारांची मागणी केली. त्यातील दोन लाख रुपये त्रिवेदीकडे देण्यास सांगितले.
अन् सापळ्यात अडकले
संबंधित झोपडीधारकाने एसीबीकडे तक्रार दाखल केली. तिची एसीबीने मंगळवारी पडताळणी केली आणि बुधवारी सापळा रचला. या कारवाईत दिनेश श्रेष्ठी यांच्या सूचनेवरून त्रिवेदीने तक्रारदाराकडून ६० हजार रुपये घेतले आणि ते रिक्षा चालक यादवकडे देताच एसीबीने दोघांना पकडले. त्यापाठोपाठ दिनेश यांनाही अटक करण्यात आली.