(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील निवळी येथील संजय सुरेश निवळकर यांची दहशत, दादागिरीला आळा घालण्याबाबत बहुजन समाज पार्टी रत्नागिरीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी तालुक्यातील निवळी बौध्दवाडी येथे दि. ०७/०२/२०२४ रोजी माता रमाई आंबेडकर जयंतीचे आयोजन वाडीतील महिला मंडळाच्या वतीने साजरी करण्याचे नियोजन केले होते. त्या दिवशी सकाळी रमाई आंबेडकर जयंती निमित्त सकाळी ७ च्या दरम्यान स्पीकर लावण्यात आला होता. परंतु त्याचवेळी आपल्या पोलीस प्रशासनाच्या ११२ क्रमांकावर निवळीतुन फोन आला की, निवळी बौध्दवाडीत रात्रभर स्पिकर चालु आहे, आमच्या झोपेची मोड झाली अशी फोन वरुन तक्रार केली. पोलीसांचा निवळीतील बौध्दवाडीत फोन आला, स्पीकर सुरु असल्याची तक्रार आली आहे तुम्ही ग्रामीण पोलीस ठाण्यात येवुन जा, जयंतीची गडबड असल्याने वाडीतील मंडळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहचली.
दरम्यान तिथे गेल्यानंतर तक्रारदाराचे नाव सांगताना टाळाटाळ केली जात होती, नंतर पोलीस निरिक्षक श्री. नितीन ढेरे यांनी श्री. संजय सुरेश निवळकर यांनी तक्रार केल्याचे सांगितले. त्यानंतर स्पीकर कधीपासुन लावला, का लावला याची खरी वस्तुस्थिती पोलीस निरिक्षक यांना नितीन ढेरे सांगितली. त्यानंतर निवळी बीट अंमलदार श्री. वाजे (पोलीस) यांनी निवळी बौध्दवाडीतील ग्रामस्थांना धीर देवुन न्याय मागण्यासाठी मंडळींना निवळकर बाबत सांगितले की, ‘तो कसा आहे, माहिती आहे ना, त्याच्या नादाला कशाला लागलात ?’ त्यानंतर हि ग्रामस्थ मंडळी श्री. ढेरे यांनी सांगितले की तो परत करणार नाही, मी त्याला समज देतो, परंतु खोटी तक्रार देवून निवळी, बौध्दवाडीतील सामाजिक कार्यक्रमात अडथळा आणण्याऱ्या संजय निवळकर यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.
तसेच या आधी १ जुन २०१९ रोजी वाडीत संजय निवळकर यांच्या भावाने बौध्दवाडीतील तरुणाच्या लोखंडी सळीने हल्ला केला होता. त्यावेळी सदर वादात याने हल्ला करणाऱ्या भावाला पाठबळ दिले होते, शुल्लक वादावरुन पण संजय निवळकर दमदाटी आणि दादागिरीची भाषा सतत बौध्दवाडीतील ग्रामस्थांसोबत करीत असतो. त्याचबरोबर या संजय निवळकर यांच्या मोठ्या अवजड वाहतुकीच्या गाड्या आहेत, त्या घेऊन जाताना समोरुन जर बौध्दवाडीतील तरुण दुचाकी घेऊन आले तर त्यांना मोठ्या गाडीवरुन हुलकावणी देण्याचे प्रकार जाणीवपूर्वक करतात. यामध्ये यांच्या या वागण्याचे दुचाकीचा अपघात होऊन बौध्दवाडीतील तरुण जखमी झाल्यास श्री. संजय निवळकरच जबाबदार असतील असेही नमूद करून याबाबत जिल्हा अधीक्षकांना नोंद घेण्यास सांगितले आहे. संजय निवळकर या मुजोरी, दमदाटी, दादागिरी, दहशतीचे वातावरण करुन दहशत संपवुन यावर प्रतिबंधात्मक आळा घालावा अशी मागणी बसपाने निवेदनाद्वारे केली आहे. यात पदाधिकारी राजेश सावंत, अनिकेत पवार, किशोर पवार, प्रीतम सावंत यांच्या सह्या आहेत.