( संगमेश्वर / प्रतिनिधी )
विद्यार्थ्यांची कला त्यांच्या बालवयात जतन करणे खूप महत्वाचे असते . बालवयात मुलांच्या विचारांची झेप कल्पनाशक्ती पलीकडील असल्याने त्यांच्या अंतर्मनातून उमटणारा एखादा विषय हा भल्याभल्यांना अंतर्मुख करणारा असतो . बालकलेचे महत्व ओळखून संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलने कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा संग्रह करण्याचा उपक्रम हाती घेतला . प्रजासत्ताक दिनी व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते रौप्य महोत्सवी २५ व्या कलासाधना चित्रकला वार्षिकचे प्रकाशन करण्यात आले.
सन २००० साली कलासाधना हा चित्रकला वार्षिक तयार करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांच्याच संकल्पनेतून सुरु करण्यात आला . चित्रकलेतील विविध विभागांची आवड असणारे विद्यार्थी वर्षभरात ज्या कलाकृती तयार करतात त्यातील उत्तम कलाकृतींची निवड करुन कलासाधना हे चित्रकला वार्षिक तयार केले जाते . वर्षभर कला अभ्यासक्रमांतर्गत काम करीत असतांना विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी आणि या स्पर्धेतून त्यांच्या हातून उत्तमोत्तम कलाकृती निर्माण व्हाव्यात याच बरोबर ग्रामीण भागातील हे बालकलाकार भविष्यात उच्च कलाशिक्षण घेण्यासाठी शहरांत गेले तर , तेथील स्पर्धेत ते टीकावे किंबहुना पुढे जावेत हा या उपक्रमामागील प्रशालेतील कला विभागाचा हेतू आहे.
कलासाधना चित्रकला वार्षिक मधील कलाकृती एवढ्या सुंदर आहेत की त्या प्रशालेतील चिमुकल्या हातांनी रेखाटल्या असतील असे वाटतच नाही . प्रशालेकडे एक हजार पाचशे कलाकृतींचा संग्रह होणे ही शाळा आणि संस्थेला अभिमानाची बाब असल्याचे मत संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांनी या चित्रकला वार्षिक प्रकाशनानंतर बोलतांना व्यक्त केले . शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी कलासाधना मधील चित्र आवर्जून पाहावी असे आवाहन सचिव धनंजय शेट्ये यांनी यावेळी केले .
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे , सचिव धनंजय शेट्ये , सहसचिव अनिल शिंदे, सदस्य संदीप सुर्वे , रमेश झगडे , जितेंद्र प्रसादे , अप्पा कुष्टे , खान, म्हालदार, समीर शेरे, दिनेश आंब्रे, किशोर पटेल, बाबा नारकर, गोविंद भिडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदि मान्यवर उपस्थित होते .
प्रकाश राजेशिर्के ( आंतरराष्ट्रीय चित्रकार – शिल्पकार ) :
विद्यार्थ्यांची कला ही एखाद्या तज्ञ कलाकारालाही कधीकधी अंतर्मुख व्हायला लावते . बालकलाकारांच्या अंतर्मनातील भावविश्व ते कलेतील सर्व मर्यादा नियम ओलांडून अत्यंत निरागसपणे आपल्या कलाकृतीतून दृष्य रुपात आणत असतात . प्रसंगी बालकला समजणेही अवघड जाते . यासाठी बालकलाकारांना त्यांच्या कलाकृतीत काम करतांना नियमांच्या चौकटीत बांधून न ठेवता मोकळेपणाने काम करायला दिल्यास कागदावर त्यांच्या मनातील खरे आकार आणि रंग उमटतात . यातूनच आश्चर्यकारक चित्रे तयार होतात . पैसा फंडचा कलासाधना हा उपक्रम अशा कलाप्रेमी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून यामुळेच येथील असंख्य विद्यार्थी कलाक्षेत्रात आपली उल्लेखनीय प्रगती करीत आहेत . सलग २५ वर्षे कला साधना चित्रकला वार्षिक मोठ्या मेहनतीने तयार केले जात असल्याबद्दल प्रशालेतील कला विभागाचे मनापासून अभिनंदन !
फोटो : कलासाधना या बालकलाकारांच्या चित्रकला वार्षिकचे प्रकाशन करतांना अनिल शेट्ये सोबत किशोर पाथरे , संदीप सुर्वे, रमेश झगडे, धनंजय शेट्ये , जितेंद्र प्रसादे, अनिल शिंदे, गोविंद भिडे, दिनेश आंब्रे, अप्पा कुष्टे दिसत आहेत . ( छाया – मिनार झगडे, संगमेश्वर )