(संगमेश्वर / प्रतिनिधी)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाच्या आणि मोठी वर्दळ असणाऱ्या चिपळूण बस स्थानकात गेली काही वर्ष दिवस रात्र मनोरुग्णांचा वावर असून त्यांच्या विचित्र हावभाव आणि वागण्याचा तसेच त्यांच्याकडून वापरण्यात येणाऱ्या अप शब्दांचा प्रवासी वर्गाला मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. संबंधित यंत्रणेने या मनोरुग्णांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.
चिपळूण बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. या कामाला होत असलेल्या विलंबामुळे बस स्थानकाला जागा कमी पडते. अशा स्थितीत प्रवासी मिळेल तेथे उभ राहून बसची वाट पाहत असतात. त्यातच बस स्थानकात असणाऱ्या काही मोजक्या बाकड्यावर गेले दोन ते तीन वर्षे काही मनोरुग्ण दिवस रात्र ठाण मांडून आणि आपले सर्व साहित्य इतस्तता पसरून बसलेले असतात. प्रवाशांनी या मनोरुग्णांना सामान आवरण्याची विनंती केली, तर हे मनोरुग्न प्रवाशांच्या अंगावर धावून जातात आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात.
यातील चार मनो रुग्ण हे चिपळूण नजीकच्या गावातील असून संबंधित यंत्रणेने त्यांच्या नातेवाईकांचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करत, मनोरुग्णांना नातेवाईकांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे. गणेशोत्सव अगदी नजीक येऊन ठेपला आहे. या कालावधीत चिपळूण बस स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. गर्दीच्या कालावधीत हे मनोरुग्ण प्रवाशांना डोकेदुखी ठरणार आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चिपळूण पोलीस तसेच मनोरुग्णांवर काम करणाऱ्या संस्था यांनी या मनोरुग्णांना एकतर जिल्हा मनोरुग्णालयात दाखल करावे अथवा नातेवाईकांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
चिपळूण बस स्थानकात ठाण मांडून असलेले हे मनोरुग्ण स्थानकातील मोजकीच बैठक व्यवस्था खराब करून टाकतात. बाहेरून आणलेले अन्न इतस्तता पसरून ठेवतात. बस स्थानकात स्वच्छता करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील हे मनोरुग्ण अंगावर धावून जात शिवीगाळ करतात. या सर्वाचा प्रवासी वर्गाला मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. हे मनोरुग्ण अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याने बस स्थानकात महिलांना उभे राहणे देखील कठीण झाले आहे. या सर्वच मनोरुग्णाच्या बाबतीत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.
◾ज्यादा बस शिवाजीनगर येथून सोडाव्यात
चिपळूण बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे रखडलेले काम पाहता आगामी गणेशोत्सव काळात येणाऱ्या जादा बस चिपळूण शिवाजीनगर बस स्थानकात आणाव्यात तसेच चिपळूण येथून सुटणाऱ्या जादा बस शिवाजीनगर बस स्थानकातूनच सोडाव्यात अशी मागणी देखील प्रवासी वर्गाने केली आहे. चिपळूणच्या शिवाजीनगर बस स्थानकाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून येथे मुबलक जागा उपलब्ध असल्याने वाहतूक कोंडीचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. परिणामी विभाग नियंत्रकांनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.