(रत्नागिरी)
ब्रिटिशांनी अनेक उत्तम रुग्णालये बांधली. आपण ब्रिटिशांना हाकलून दिले. मात्र, त्यानंतर सरकारला अशी चांगली सरकारी रुग्णालये बांधता आली नाहीत. उलट जी आहेत, तीच हलविण्याचा घाट घातला जात आहे. रत्नागिरीतील १३८ वर्षांपूर्वीचे १४ एकरवर असलेले प्रादेशिक मनोरुग्णालय येथून जयसिंगपूरला हलविले जात आहे. मात्र, हे रुग्णालय जमीनदोस्त करताना आमच्या शरीरावरूनच जेसीबी घालावे लागतील, अशी आक्रमक भूमिका प्रादेशिक मनोरुग्णालयासमोर झालेल्या आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयाची स्थापना ब्रिटिशांनी १८८६ साली केली. या रुग्णालयाला १३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. पाच जिल्ह्यांसाठी असलेले हे महाराष्ट्रातील सुसज्ज असे एकमेव मनोरुग्णालय आहे. या मनोरुग्णालयातील स्टाफ प्रशिक्षित असून डॉक्टरही खूप चांगले आहेत.असे असताना रत्नागिरीतील हे मनोरुग्णालय जयसिंगपूर येथे हलविण्यात येणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी सकाळी मनोरुग्णालयासमोर अॅड. अश्विनी आगाशे यांच्या नेतृत्त्वाखाली विविध घोषणांच्या फलकाद्वारे शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी राजन आयरे, रुपाली सावंत, मिलिंद कीर, युयुत्सू आर्ते, दीपक सुर्वे आदींसह नागरिक उपस्थित होते.
ॲड आश्विनी आगाशे यांनी सांगितले की, आपण माहितीच्या अधिकारात माहिती घेतल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, हे मनोरुग्णालय जयसिंगपूर हलविण्यासाठी २०२२ ते सन २०२४ या तीन वर्षांच्या कालावधीत जोरदार प्रयत्न करून खोटी कागदपत्रे रंगविली आहेत. याबाबत माहिती घेतली असता, यातील मनोरुग्णालयाचा काही भाग सिव्हील हॉस्पिटलला देण्यात येणार असल्याचे समजले. परंतु, संपूर्ण मनोरुग्णालय जयसिंगपूरला हलविणे हा रत्नागिरीकरांवर अन्याय आहे. याबाबतचे निवेदन मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
स्थलांतराचा प्रस्ताव नाही
दरम्यान, या मनोरुग्णालयाच्या स्थलांतराचा प्रस्तावच नसल्याचा पुनरुच्चार मंत्री उदय सामंत यांनी १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांनी आरोग्य सचिवांशी झालेले आपले संभाषणाचा हवाला दिला आहे. तसेच हे रुग्णालय इथेच राहील, असेही ते म्हणाले.