( लांजा )
तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी – येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर – तहसीलदार प्रमोद कदम यांनी वेरवली धरण धबधबा आणि खोरनिनको धबधबा परिसरात १४४ कलम लागू – केले आहे. या भागात कोणी दिसल्यास लांजा पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या भागात शनिवार व रविवारी पोलिस तैनात ठेवण्यात येणार आहेत.
वेरवली बेर्डेवाडी धरण धबधब्यात अंघोळ व मौजमस्ती करताना कळसवली (ता. राजापूर) येथील एका २६ वर्षीय युवकाचा डोहात बुडून मृत्यू झाला होता. पाटबंधारे विभागाने बेर्डेवाडी धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडल्याने येथील धबधबा मे महिन्याच्या शेवटी प्रवाहित झाला होता. सोशल मीडियावर या धबधब्याचे फोटो व्हायरल झाल्याने जिल्ह्यातील पर्यटकांसह मुंबई इतर ठिकाणाहूनही पर्यटक येथे दाखल होऊ लागले होते.आता मुसळधार पाऊस सुरू झाल्याने हा धबधबा अधिक प्रवाहित झाला आहे.
युवकाच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासन, पोलिस आणि पाटबंधारे विभाग सतर्क झाले आहेत. लांजाचे तहसीलदार प्रमोद कदम यांनी लांजा पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार बेर्डेवाडी धरण आणि खोरनिनको मुचकुंदी धरण धबधबा या परिसरात मनाई करण्याचे आदेश काढले आहेत. मुंबई पोलिस अधिनियमानुसार धरण परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. बेर्डेवाडी आणि खोरनिनको येथे पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे पावसात धरणावर पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. या भागात पर्यटकांसह नागरिकांनी न जाण्याचे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.