(चिपळूण)
आकार एज्युकेशनल ट्रस्टच्या संस्थापिका व अध्यक्ष तसेच ए.एच.ए. -कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, पिंपळी, चिपळूणच्या प्राचार्या सौ. रोहिणी दीपक ओतारी यांना दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी “भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार 2024” या राष्ट्रीय पुरस्काराने पत्रकार भवन पुणे या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार हा विविध क्षेत्रातील विशेषतः शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये पात्रता असलेल्या व्यक्तींनाच विशेष योगदानाबद्दल दिला जातो. इतकेच नव्हे तर सदर पुरस्कार देताना सदर पुरस्कृतांना विविध पात्रता श्रेणी मधून जायचे असते व शेवटी योग्य त्या पुरस्कृताची या ठिकाणी निवड करण्यात येते.
रोहिणी दीपक ओतारी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सक्रीय असतात. त्याचप्रमाणे समाजासाठी सतत काहीतरी नवनवीन उपक्रम राबवून त्यातून रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल यासाठी त्या कायम प्रयत्नशील असतात. महिलांसाठी स्वयंरोजगाराचे काम होत आहे आणि या बद्दलच त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत, यातली उल्लेखनीय भाग म्हणजे शिक्षण रत्न पुरस्काराने सुद्धा नुकतेच गौरविण्यात आले होते.
कर्तबगार महिला सन्मान, आयकॉनिक रोड मॉडेल इन एज्युकेशन हा राष्ट्रीय पुरस्कार, एज्युकेशनीस्ट ऑफ द इयर, गुरुद्रोणाचार्य पुरस्कार तसेच महिला दिनानिमित्त त्यांची झालेली एफ एम रेडिओवरची मुलाखत या सर्वांची दखल घेत त्यांनी केलेल्या उत्कृष्ट अशा शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी या वर्षीच्या प्रतिष्ठित असा “भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार 2024” त्यांना प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आणि पूर्वीच्या मीस इंडिया प्रिया रॉय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष डॉ.अविनाश, मुंबईच्या सुप्रसिद्ध वकील सौ.कामिनी मॅडम तसेच नीती आयोग व अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य, पत्रकार व इतर मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. सौ रोहिणी दीपक ओतारी यांचे कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी असून सर्व स्तरावरून त्यांचे हा पुरस्कार मिळाल्यामुळे कौतुक करण्यात येत आहे.