(नवी दिल्ली)
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वढेरा अखेर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी बुधवारी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत वायनाडमध्ये भव्य रोड शो करीत जाहीर सभाही घेतली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तरप्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड अशा दोन मतदारसंघांतून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी वायनाडची जागा सोडली. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. राजीनामा दिला असला, तरी वायनाडसोबत मी कायम जुळला आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते आणि तेव्हाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी प्रियांका वढेरा यांची उमेदवारीही जाहीर केली होती.
काँग्रेस नेत्या प्रियांका वढेरा यांनी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे, काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या व संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. तत्पूर्वी, त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत वायनाडमध्ये भव्य रोड शो केला. यावेळी मल्लिकार्जुन खडगे म्हणाले की, राहुल यांनी सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा वायनाडमधील जनतेची मागणी आणि गांधी कुटुंबावरील प्रेम यामुळे आम्ही प्रियांका वढेरा यांना वायनाड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.
पाच वर्षांपासून प्रियांका राजकारणात सक्रिय झाल्या होत्या, काँग्रेस महासचिव म्हणून त्या कामाला लागल्या होत्या. त्या पडद्याआडून सूत्रे हलवत होत्या. सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे निवडणूक व्यवस्थापन पाहात होत्या. २०१९ नंतर प्रियांका वढेरा या खर्या अर्थाने राजकारणात झाल्या. काँग्रेस महासचिव म्हणून त्यांची औपचारिक नियुक्ती करण्यात आली. वायनाडमध्ये प्रियांकांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी काढण्यात आलेल्या रोड शोमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय मल्लिकार्जुन खडगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. ३५ वर्षे मी काँग्रेससाठी प्रचार केला, मत आता मी माझ्यासाठी प्रचार करणार, मत मागणार, असे प्रियांका यांनी यावेळी म्हटले.
१३ नोव्हेंबरला मतदान
वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय) ज्येष्ठ नेते सत्यान मोकेरी यांना उमेदवारी दिली आहे. वायनाड पोटनिवडणुकीसाठी १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.