(रत्नागिरी)
कुठल्याही आजाराच्या निदानासाठी आता रक्तचाचण्या किंवा इतर तपासणी करणे अनिवार्य झाले आहे. या चाचण्या सरकारी रुग्णालयात मोफत होतात. मात्र, याच चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळेत रुग्णाला हजारो रुपये मोजावे लागतात. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी २००, तर काही ठिकाणी ५०० असे दरही वेगवेगळे असतात.
एखादा आजार झाल्यास तो आजार कुठला आहे, हे कळण्यासाठी डॉक्टर रक्ताच्या किंवा अन्य विशिष्ट तपासणी करायला सांगतात. सरकारी रुग्णालयात बहुसंख्य चाचण्या अगदी १०-१२ रुपयांमध्ये तर काही अगदी मोफत केल्या जातात. मात्र, त्याच तपासण्यांसाठी खासगी प्रयोगशाळेत हजारो रुपये घेतात. बहुतांश खासगी रुग्णालयांच्या प्रयोगशाळा असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना याच प्रयोगशाळेत या चाचण्या कराव्या लागतात. मात्र, एका चाचणीसाठी ४०० ते ७००, तर काही चाचण्यांसाठी १००० किंवा १२०० रुपये द्यावे लागतात. सामान्य रुग्णाला या चाचण्या करून घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. भरमसाठ पैसे घेणाऱ्या या प्रयोगशाळांवर कुणाचे नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही. शासकीय दवाखान्यात चाचण्या अल्पदरात किंवा मोफत होतात. मात्र, खासगी प्रयोगशाळांमध्ये दर वेगवेगळे असतात. त्यामुळे दरांमध्ये फरक का, असा प्रश्न केला जात आहे.
यावर नियंत्रण कोणाचे?
खासगी रुग्णालयांच्या प्रयोगशाळा किवा खासगी अन्य प्रयोगशाळा यामध्ये रक्तचाचण्या किंवा अन्य तपासण्या करण्यासाठी भरमसाठ पैसे घेतले जातात. मधुमेहींना सतत तपासणी करावी लागते. मात्र, त्यासाठी दामदुप्पट पैसे मोजावे लागतात. यावर मात्र नियत्रंण कोणाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.