(गणपतीपुळे/ वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गायवाडी येथील शिवसेवा मित्र मंडळ आणि कोकण प्रतिष्ठान मालगुंड यांचे वतीने सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. या सत्यनारायण महापूजचे औचित्य साधून प्रसिद्ध रांगोळीकार तथा मालगुंड गावचे सुपुत्र राहूल कळंबटे यांचा राज्य, देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रांगोळी कलेत सर्वोत्तम यश संपादन केल्याबद्दल तसेच अभिनय कलेतील यशाबद्दल मालगुंड गावची सुकन्या रसिका पवार यांचा सन्मान भेटवस्तू देऊन करण्यात आला. कोकण प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत मालगुंड गावचे उपसरपंच संतोष चौगुले यांच्या हस्ते रांगोळीकार राहूल कळंबटे व रसिका पवार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कोकण प्रतिष्ठानचे सर्व सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
प्रसिद्ध रांगोळीकार राहूल कळंबटे यांनी आपल्या रांगोळी कलेने विविध ठिकाणी विशेष यश संपादन करूनअनेक बक्षीसे पटकावली. आपल्या गावाचे नाव त्यांनी उज्ज्वल केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन कोकण प्रतिष्ठान मालगुंडने त्यांचा सन्मान केला आहे. तसेच अभिनय कलेतील यशाबद्दल रसिका पवार हिने मोठी गरूडझेप घेतली आहे. त्यामुळे तिचाही सन्मान करण्यात आला. कोकण प्रतिष्ठान मालगुंडने प्रसिद्ध रांगोळीकार राहूल कळंबटे आणि रसिका पवार यांचा सन्मान केल्याने संपूर्ण मालगुंड परिसरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.