(संगमेश्वर / वार्ताहर)
संगमेश्वर पोलीस स्थानकातील पोलीस हेड कॉन्सटेबल प्रशांत शिंदे यांची महाराष्ट्र पोलीस खात्यातील कर्तबगार आणि यशोमय कामगिरीमुळे त्यांची पोलीस प्रशासनाकडून पोलीस उपनिरिक्षकपदी बढती करण्यात आल्याने त्यांचेवर सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
पोलीस खात्यातील झुंझार व कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून प्रशांत शिंदे यांनी पोलीस खात्यासह सर्वत्र स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार अनेक गुन्ह्याचा तपास उलगडून पोलीस खात्याचे नाव रोशन केले आहे.
चिपळूण तालुक्यातील त्यावेळच्या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या कोळकेवाडी या गावचे ते सुपुत्र असून शालेय जीवनापासूनच त्यांचे पोलीस होण्याचे स्वप्न व जिद्दही होती. त्यांचेकडे जिद्द आणि चिकाटी त्यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले आहे. सन 2091 साली त्यांची पोलीस दलात भरती झाले. सुरुवातीला जिल्हयातील खेड पोलीस ठाण्यात ते रुजू झाले. त्यानंतर कशेडी, देवरुख, संगमेश्वर पोलीस ठाणे असा त्यांचा प्रवास सुरु राहिला असून 33 वर्षीय पोलीस सेवा कारकिर्दीत ”आदी खाकी, मग बाकी” या उक्ती प्रमाणे कोणताही मुलाहिजा न बाळगता इमानेइतबारे कर्तव्यदक्षपणे ते यशस्वी सेवा बजावत आहेत.
प्रशांत शिंदे यांनी गुन्हयांचा तपास करून काही आरोपींना जेरबंदही केले आहे. तर सर्व सामान्याच्या तक्रारी सोडवून गौरगरीबांना हक्काचा योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुद्धा त्यांनी केला आहे. तेहत्तीस वर्षीय पोलीस सेवा कार्यकाळात त्यांनी कर्तव्याशी प्रामाणिक राहून अनेक गुन्ह्यांची उकल केली असतानाच अनेक उल्लेखनीय कामे केली असून सध्या ते संगमेश्वर पोलीस ठाण्यात सेवा बजावत असून त्यांच्या कार्याची दाखल महाराष्ट्र पोलिस प्रशासनाने घेत नुकतेच त्यांना 1मे महाराष्ट्र दिनी महासंचालक पदाने गौरविण्यात आले होते. तर दोन महिन्यातच त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झाल्याने संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या शिरपेचात दोन महिन्यात दोनदा मानाचा तुरा रोवला आहे.
खाकी वर्दीतला असून साधा सरळ स्वभाव, सर्वांबरोबर मिळून मिसळून राहणारा सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणाऱ्या प्रशांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक झाल्याचे समजताच अनेकजण प्रत्यक्षात भेटून तसेच सोशल मीडिया माध्यमाद्वारे अनेकजण त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा देत आहेत.