( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमरत्न फाउंडेशन’च्या वतीने दि २५ आणि २६ जानेवारी रोजी, सह्याद्रीचा मुकुटमणी शृंगारपूरचा पहारेकरी, किल्ले प्रचितगडावर स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबविण्यात आली.
दृर्गप्रेमी अल्पेश सोलकर यांच्या सोबत ४०हून अधिक शिवप्रेमींनी या मोहिमेत सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या या मावळ्यांनी शनिवारी दुपारपासूनच प्रचितगडाचे मुख्य प्रवेशद्वार जे मातीच्या ढिगाऱ्याखाली गायब झाले होते, त्या ठिकाणी उन्हा- तान्हाची पर्वा न करता, अंगमेहनत करून प्रवेशद्वार खुले केले. गडावर वाढलेले कारवीचे जंगल साफ केले, गडावरील गुहेतील पाण्याच्या तलावाचा परीसर स्वच्छ केला, तसेच मंदीराचीही साफसफाई केली.
दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी गडावर ध्वजारोहण करण्यात आले आणि दुपारी १२ वा. मोहिमेची सांगता करुन दु. तीनच्या सुमारास शृंगारपूरात परतले. शृंगारपूर ग्रामविकास मंडळ मुंबईच्या कार्यकारी मंडळ आणि काही सभासदांच्या वतीने सहभागी सर्वांना “हॉटेल भैरी भवानी खानावळ” या ठिकाणी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती,
मोहिमेच्या प्रारंभी शनिवारी सकाळीही विनोद म्हस्के यांच्यावतीने चहानास्ताची व्यवस्था केलेली होती. नास्ता करुनच सर्व दुर्गप्रेमीं गडावर गेले. मंडळाचे अध्यक्ष चव्हाण, स्वतः हजर राहून कोणाला कशाचीही कमतरता भासू नये म्हणून या सर्व गोष्टींवर जातीने लक्ष ठेवून होते.सायंकाळी ५ वा. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत शृंगारपूर, ग्रामविकास मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ यांच्यावतीने संगमरत्न फाउंडेशन’च्या सर्व सवंगड्यांच्या अभिनंदनाचा छोटासा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, यावेळी सरपंच विनोद पवार, मंडळाचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले. मंडळाच्यावतीने आभारपत्र देऊन संगमरत्न फाउंडेशन’च्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी शृंगारपूर गांवाने केलेलं सहकार्य, पाहुणचार आणि दिलेलं प्रेम पाहून उपस्थित सर्व शिलेदार भारावून गेले. त्यांना यापूर्वी कधीही न मिळालेला सुखद असा अनुभव मिळाला. यावेळी पोवाडाही सादर करण्यात आला. पुन्हा एकदा अशीच मोहीम राबवण्याचे आश्वासन देऊन सर्वांनी शृंगारपूर गांवाचा निरोप घेतला.