( रत्नागिरी /प्रतिनिधी )
थिबा राजा बुध्द विहार विकास ट्रस्टच्या अध्यक्षांनी ट्रस्ट रद्द झालेला नाही असे वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा समाज स्तरावर रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भीम युवा पँथर संघटनेचे पदाधिकारी आक्रमक होऊन त्यांनी मंगळवारी ( दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी ) पत्रकार परिषदेचे आयोजन केले. निर्माण केलेल्या ट्रस्टवर भीम युवा पँथर संघटनेचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी चांगलेच ताशेरे ओढले. बैठकीनंतर जवळ जवळ १ आठवडयाने त्यांना प्रेस घेणेची गरज का लागली? ते कुणाची वाट बघत होते ? कुणाच्या तरी दबावाखाली त्यांनी भुमिका बदलली आहे? असे प्रश्न उपस्थित करून १२ जानेवारीच्या बैठकीत जे घडले ते सर्वच पत्रकार परिषदेमद्ये सांगून ट्रस्टचे पितळ उघडं पाडले आहे.
यावेळी माहिती देण्यात आली की, समाज स्तरावर दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या भर बैठकीत अध्यक्ष प्रकाश पवार म्हणाले होते की, आपल्या सभागृहाचे जे म्हणणं आहे ते आमचंही म्हणणं आहे सगळी जागा पाहिजे अशा प्रकारचे सगळ्यांचे म्हणणं आहे. इथून पुढे आता ट्रस्टला व्हॅल्यू काय नाय, हा ट्रस्ट रद्द …. ऐका ऐका आता …माझं झाल्यानंतर तुम्हाला काय जे बोलायच ते बोला… सगळ्यांचं म्हणणं आलेलं आहे की, हा ट्रस्ट रद्द पाहिजे हा ट्रस्ट समाज मान्य नाही ओक्के! आम्ही ही ते मान्य करतो. असे भर बैठकीत ट्रस्ट रद्द करण्याबाब दिनांक १७/०१/२०२५ रोजी थिबा राजा कालीन बुध्दविहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्टने प्रेस कॉन्फरन्स घेवून ट्रस्ट संबंधी व बुध्दविहारा संदर्भात उहापोह केला. वास्तविक ट्रस्टच्या अध्यक्षांनी सपशेल कोलांटि उडी मारली व सांगितले की, ट्रस्ट आम्ही रदद केलीच नाही. दि. १२/०१/२०२५ रोजीच्या बैठकीनंतर जवळ जवळ १ आठवडयाने त्यांना प्रेस घेणेची गरज का लागली? ते कुणाची वाट बघत होते ? कुणाच्या तरी दबावाखाली त्यांनी भुमिका बदलली आहे? हे स्पष्ट होते. प्रकाश पवार हे एका धार्मिक संघटनेचे नेते आहेत. त्यांनीच खोटे बोलावे हे राजकारण्यांनादेखील जमणार नाही. अशी गोष्ट त्यांनी केलेली आहे. समोर बसलेल्या समाज बांधवांसमोर त्यांनी ट्रस्ट रद्द करत असल्याची घोषणा केली असे जाहीर अध्यक्षांनी स्वतः सांगितल्याचे अमोल जाधव यांनी यावेळी सांगितले.
यापुढे, भिम युवा पँथर व समाजाची अशी मागणी होती की, ज्यांनी ट्रस्टमार्फत राजकीय अजेंडा राबविला, त्यांना दुर करा. परंतु हा निर्णय घेणे अध्यक्षांना सोप नसल्याने त्यांनी संपुर्ण ट्रस्टच रदद करत असल्याचे जाहीर केले. त्यासंबंधीचे पुरावे भिम युवा पँथरकडे आहेत. ते म्हणतायत समाजातील काही लोक संभ्रम निर्माण करतायत. मात्र आमचे ठाम म्हणणे आहे की, ट्रस्टचे पदाधिकारी स्वतः संभ्रमित झालेले आहेत. आणि समाजालादेखील ते संभ्रमित करत आहेत. दि. १२/०१/२०२५ च्या सभेमध्ये त्यांनी जाहीर आश्वासन दिले आहे की, आम्ही समाजाच्या भावनांसोबत आहोत. समाजालाच नव्हे तर आम्हाला देखील थिबा राजा कालीन बुध्दविहाराच्या इथे बौध्दविहारच झाले पाहिजे असे वाटते. जमिन समाजाच्या ताब्यात मिळाली पाहिजे व त्याठिकाणी जर बौध्द विहारासाठी शासकीय निधी मिळत नसेल तर समाज स्वतःचे हिंमतीवर विहार निर्माण करेल. या भूमिकेशी देखील आम्ही सहमत आहोत. यापुढील कामकाज समाज आणि आम्ही एकत्र मिळून करू. असे जाहीर केले असताना दि. १७/०१/२०२५ रोजीच्या प्रेसमध्ये कम्युनिटी सेंटर बांधले तरी चालेल, ते बुध्दविहारच आहे, कम्युनिटी सेंटरसाठी काही ठराविक लोकांचा विरोध आहे, असे ते म्हणतायत. वास्तविक ते स्वतः खोटं बोलत आहेत. परंतु समाजाला देखील ते खोट ठरवत आहेत. आणि हे खुपच संतापजनक असल्याचे जाधव म्हणाले.
वास्तविक कम्युनिटी सेंटर आणि बौध्दविहार यामध्ये जमिन आस्मानचा फरक आहे. कम्युनिटी सेंटर म्हणजे समुदाय केंद्र, ज्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबवू शकतात. बौध्दविहार हे (बौध्द अनुयायांचे) बुध्दिष्ठ लोकांसाठीचे संस्कार, धम्म आचरण करण्यासाठीचे प्रार्थना स्थळ आहे. आणि थिबा राजाचे बौध्दविहार तर सुमारे १२० वर्षापुर्वीचे पुरातन प्रार्थना स्थळ आहे. आणि त्याची जपणुक करणे हे तमाम बौध्द अनुयायांचे कर्तव्यच आहे. आणि सदर जमिनीच्या सातबारावर “थिबा राजा कालीन बुध्दविहारासाठी राखीव जागा अशी नोंद देखील आहे. त्याचबरोबर शासनाने २००९ च्या अगोदरची अनधिकृत प्रार्थनास्थळे नियमित करण्यासाठी २०१७ साली निर्णय घेतला होता. त्यामध्ये “म्यानमारच्या थिबा राजाचे बौध्दविहार स्थळ शासनाने अधिकृत केलेले आहे. असे असताना चॅरिटेबल ट्रस्टला त्याठिकाणी बुध्दविहाराऐवजी कम्युनिटी सेंटर व्हावे असे का वाटते ?. त्यासाठी एवढा आटापिटा का हा मोठा प्रश्न आहे. कदाचित त्यासाठी मंजूर झालेली ७.५ कोटी रुपये कारणीभूत तर नाही ना.? कारण ट्रस्टमधील काही २-४ लोकांना त्याचे सबकॉन्ट्रक्ट मिळणार असल्याचे समजते. २-४ लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी हे संपुर्ण समाजाला वेठीस धरण्याचा प्रकार करत आहेत. कारण कम्युनिटी सेंटर बांधण्याची मागणी ट्रस्ट ने दिनांक ०३/०९/२०२४ रोजीच्या पत्राने नगर परिषदेकडे केलेली आहे, यांचा हेतू प्रामाणिक नसल्यानेच हे एका पुरातन संस्कृतीचे अस्तित्व मिटवायला निघालेले आहेत. सदर जमिन मिळणेसाठी जर ट्रस्टची स्थापना झालेली होती तर जमिन न मिळविता कम्युनिटी सेंटर बांधण्याचा अटटाहास का ? जमिन शासनाची इमारत शासनाची मग ट्रस्टचे काम काय ? मग ट्रस्ट कशाला हवी ? तालुक्यातील, जिल्हयातील बौध्द समाजाला त्याठिकाणी कम्युनिटी सेंटर नको, तर बौध्दविहारच हवे आहे. अशी देखील मागणी यावेळी भीम युवा पँथर संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
सदस्य करून घेण्याचे कारस्थान, समाजाला आवाहन
शिवाय संपुर्ण जमिन समाजाच्या ताब्यात हवी आहे. आणि जर ट्रस्ट प्रशासनाला हाताशी धरून काम रेटून नेण्याचा प्रयत्न करत असेल तर मग समाजामध्ये याचे तीव्र पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. संघटनेला, समाजाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल आणि याचे परिणाम ट्रस्टला व नगर परिषद प्रशासनाला भोगावे लागतील. ट्रस्टला समाज मान्यता आहे हे सिध्द करण्यासाठी या ट्रस्टच्या वतीने भविष्यात मिटींग घेवून अथवा त्यांचे जे काही मुठभर समर्थक आहेत त्यांना वार्षिक / पंचवार्षिक सदस्य करून घेण्याचे कारस्थान रचले जाऊ शकते. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अमोल जाधव यांनी समाजाला आवाहन केले आहे की, ट्रस्टच्या वतीने असे सदस्यत्व दिले जात असेल तर ते स्विकारू नये आणि जे कोणी तसे सदस्यत्व स्विकारतील त्यांनी मनाशी खुणगाठ बांधून ठेवावी की तुमच्या आणि समाजाच्या मनातील समाजाच्या मालकीचे बुध्दविहार तुम्ही कायमचे गमावून बसणार आहात आणि म्हणून सर्वसाधारण समाज बांधवानी या ट्रस्टचे सभासद होवून समाजाच्या नाशाला कारणीभूत ठरू नये. समाजानेदेखील याचा प्रामाणिक विचार करून थिबा राजाकालीन बौध्दविहार वाचविण्यासाठी आपला सहयोग द्यावा. हे संपूर्ण बौध्द समाजाला, तालुक्यातील, जिल्हयातील सर्व आंबेडकरी, सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांना यावेळी आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष अमोल जाधव, सचिव नरेश कांबळे, कार्याध्यक्ष किशोर पवार, उपाध्यक्ष उमेश कदम, सुजित चवेकर, कार्यकारिणी सदस्य अमिर जाधव, रूपेश कांबळे, राजेश मोहिते, धीरज पवार आदी उपस्थित होते.