(रत्नागिरी)
जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत जात आहे. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक न झालेले आणि पोलिसांना हवे असलेल्या १७६ गुन्हेगारांच्या शोधामध्ये स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिस यंत्रणा सक्रीय आहे. तर १७ गुन्हेगार अनेक वर्षांपासून मिळत नसल्याने न्यायालयानेच त्यांना फरार घोषित केले आहे. या गुन्हेगारांच्या शोधात पोलिस आहेत.
जिल्ह्यात रेल्वे, रस्ते वाहतुक आणि जलवाहतुकीमुळे मोठ्या गुन्हेगारीशी जिल्ह्याचा थेट संपर्क येऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील गंभीर गुन्ह्याचे आरोपी जिल्ह्यात मिळाले. केरळमध्ये झालेल्या बर्निंग ट्रेनमधील मृत्यूशी संबंधित आरोपी जिल्ह्यात मिळाला. अंमली पदार्थामध्येही जिल्ह्याचा संबंध आंतरराष्ट्रीय पातळीच्या कनेक्शनशी आला आहे. मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर अंमली पदार्थ सापडले. जिल्ह्यात अन्य ठिकाणी हे अमली पदार्थ मिळत आहेत. एकुणच जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. गुन्हेगारीचा आलेख कमी होत नसून वाढत जात आहे. यामुळे जिल्हा पोलिस प्रशासन कमी पडत असल्याने दिसून येत आहे.
यातच खुन, मारामारी, अपघात, चोरी, दरोडी आदी गुन्ह्यातील अनेक आरोपी गेल्या काही वर्षांपासून पोलिसांना हवे आहेत. परंतु ते वारंवार पोलिसांना गुंगारा देत आहेत. त्यामुळे त्या-त्या तालुक्यातील पोलिस ठाण्यांसह जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा त्यांच्या शोधात आहेt. मात्र ते मिळत नसल्याने न्यायालयाने १७ आरोपींना फरारी घोषित केले गेले आहे. फरारी घोषित केल्यानंतर त्या आरोपींची मालमत्ताही जप्त केली जाते. मालमत्तेवर टाच येण्याच्या भितीने हे आरोपी हजर होतील, या उद्देशाने ही कारवाई केली जाते. परंतु हे १७ आरोपी परराज्यातील आणि जिल्ह्यातील आहेत. त्याच्या नावे कोणतीही मालमत्ताच नसल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
पोलिस या फरार आरोपींच्या शोधात आहेत. अन्य गुन्ह्यातही पोलिसांना हवे असलेल्या आरोपीमध्ये १६७ आरोपी आहेत. ते या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे आहेत. परंतु अजून ते नजरेआड असल्याने पोलिस त्यांच्याही शोधात आहेत.