( चिपळूण )
शहरानजीकच्या वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदी किनारी येथील पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून सुमारे लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने चिपळूणमध्ये शहरानजिकच गावठी हातभट्टी सुरू असल्याचे उघड झाले आहे. चिपळूण शहरासह ग्रामीण भागात अशाप्रकारे अनेक छोटे मोटे दारुचे धंदे सुरु असल्याची चर्चा आहे. त्याठिकाणीही पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणाबाबतची फिर्याद पोलीस हवालदार अतुल सुधीर ठाकूर यांनी दिली आहे. यानुसार पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीकिनारी झाडी झुडपामध्ये छापा टाकला. त्याठिकाणी त्यांना एक जण गावठी दारू गाळत असताना आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तेथे त्यावेळी दारू उपयोगी साहित्य गुळ, नवसागर मिश्रित कुजके रसायन सापडले. तसेच ताब्यात घेतलेल्या त्या व्यक्तीकडे पोलिसांना सुमारे १ लाख ९ हजार ९०० रुपयांचा हा मुद्देमाल आढळून आला आहे. याप्रकरणी पेढे- परशुराम येथील मंगेश मधुकर दिवेकर ( वय २७) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हातभट्यांवर पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी
ही कारवाई पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हारगुडे, पोलिस हवालदार प्रितेश शिंदे, अतुल ठाकूर, श्रीनिवास जानवलकर यांनी केली. या कारवाईने वालोपे येथे हातभट्ट्या सुरू असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे चिपळूण शहरासह ग्रामीण भागात छोटे – छोटे दारू धंदे सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याकडे देखील पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.