(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांची सहकारी संस्थेतर्फे रत्नागिरीत कॅमेरा पूजन आणि फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी विषयावरील उद्बोधक व्याख्याने सादर करून जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्यात आला. तारांगण येथील सभागृहात सोमवारी हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अजय बाष्टे व पदाधिकारी, छायाचित्रकार यांनी कॅमेरापूजन केले. छायाचित्रकार ओम पाडाळकर आणि फहीम पटेल यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
या वेळी व्हिडिओग्राफर फहीम पटेल यांनी वेडिंग फिल्म मेकिंग, कलर ग्रेडिंग, डॉक्युमेंटरी फिल्म आणि व्हिजन याविषयी भरपूर माहिती दिली. प्री वेडिंगसाठी ठिकाण निवडताना सुंदर जागा, साहित्य, प्रकाशमान आणि संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले. प्री-वेडिंग शूटसाठी वधू-वरांच्या पोशाखांची निवड करताना त्यांची रंगसंगती, संकल्पनेशी सुसंगती आणि एकंदर दिसण्याचा विचार करावा, असे पटेल यांनी सांगितले. या तांत्रिक माहितीचा उपयोग व्हिडिओग्राफर्सना होणार आहे, अशा प्रतिक्रिया सर्वांनी व्यक्त केल्या.
या वेळी ओम पाडाळकर यांनी विवाहाच्या छायाचित्रणाविषयी इत्थंभूत माहिती देऊन एआय तंत्रज्ञानाचा वापर आणि छायाचित्रण कलेत अधिक सुधारणा कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. भारतीय लग्नातील फोटोग्राफी ही अत्यंत महत्त्वाची आणि अविस्मरणीय गोष्ट आहे. कौटुंबिक फोटो, सजावट, वधू-वरांचे पोशाख, वेळेचे व्यवस्थापन, फ्रेमिंग याबाबत त्यांनी खूप माहिती दिली. पारंपरिक लग्न सोहळ्यात छायाचित्रे काढताना कोणती काळजी घ्यावी, फ्रेमिंगमध्ये योग्य कोन, लायटिंग यांचा वापर करून कलात्मक छायाचित्रण करता येते. छायाचित्रांची अल्बममध्ये मांडणी, व्हिडिओमध्ये गाण्यांची मांडणी, रंगांचा मेळ याबाबतही पाडाळकर यांनी मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, कॅमेरा उपकरणे आणि लेन्सेस, नियम आणि अटी कार्यक्रमापूर्वी ठरवून घ्याव्यात, चेहेऱ्यावर भावनिकता याला महत्त्व द्या, असे पाडाळकर यांनी सांगितले.