(गुहागर)
गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठची सर्वसाधारण ग्रामसभा नुकतीच उमराठ गोरिवलेवाडी अंगणवाडी सभागृहात अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर ग्रामसभेत इतर विषयांबरोबरच दोन महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. ते खालीलप्रमाणे.
ई कचरा संकलन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक संबंधित जून्या टाकावू वस्तू आपापल्या घरी संकलित कराव्यात, इतरत्र कुठेही टाकू नये. तसेच जनावरांची विक्री किंवा या गावांतून दुसऱ्या गावात न्यायची असतील तर पशुवैद्यांचा व ग्रामपंचायतीचा दाखला घेऊन पोलीस स्टेशनला पत्र देऊनच नेण्यात यावीत. नाहीतर देणारा व घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सध्या आपण अनेक वेळा, गाई-गुरांची, जनावरांची, विक्री व तस्करी केली जात असल्याचे वाचनात येते. तस्करी करणारे अशी मुकी जनावरे कुठे व कशासाठी नेतात हे सर्वश्रुत आहेच. याबाबतची माहिती मिळावी, खबरदारी घेता म्हणून वरील प्रमाणे ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आला आहे. तसेच भविष्यात असे घडू नये म्हणून सदर ठराव मंजूर करण्यात आला असे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सांगितले.
पुर्वापार कोकणात शेती हा प्रमुख व्यवसाय असायचा आणि एकत्र कुटुंब पद्धती असायची. त्यावेळी गाई-गुरांनी भरलेला गोठा असायचा. गोठ्यात गाई-गुरे, घरी रखवालदार कुत्रा आणि उंदरांचा नाश करण्यासाठी मनीमाऊ सर्रास असायचे. ते एक एकत्र कुटुंबाचे वैभवाचे/ लक्ष्मीचे लक्षण मानले जायचे. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. सद्याची जीवनशैली बदललेली आहे. एकत्र कुटुंब पद्धती लोप पाहून स्वतंत्र कुटूंब पद्धती अस्तित्वात आली आहे. शिवाय कोकणात हवे तसे उद्योगधंदे, उपलब्ध रोजगार नसल्यामुळे उदर निर्वाहासाठी नोकरी-धंदा करण्यासाठी तरूण वर्ग मुंबई सारख्या शहरात स्थलांतरित होत असून खेडेगावात वयस्कर मंडळी वास्तव्याला असते.
त्यामुळे गाई-गुरांसारखे गतवैभव दुर्मिळ होत चालले आहे. मुक्या प्राण्यांचे, गाई-गुरांचे पोषण करणे, त्यांना सांभाळणे कठीण होत असल्यामुळे पर्याय म्हणून विक्री केली जाते. एखाद्या चांगल्या गोशाळेत खात्री करून द्यावे. परंतु जीवापाड प्रेम केलेल्या मुक्या प्राण्यांची तस्करी होऊ नये म्हणून सदर ठराव करण्यात आला आहे, असेही सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सांगितले. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी अशा प्रकारचा ठराव करून तस्करीला पायबंद घालून गोहत्या प्रतिबंधक कायद्यानुसार सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांंनी केले आहे.