(रत्नागिरी)
मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवस कृती आराखडा हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे. सर्व विभागांनी तो गांभीर्याने घ्यावा. विभागअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये अधिकाऱ्यांनी तिच्या यशस्वितेसाठी आपुलकीने पुढाकार घ्यावा. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे, अशा सूचना महसूल, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या.
क्षेत्रीय, शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा आढावा बैठक राज्यमंत्री श्री. कदम यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, ग्रामपंचायतीमध्ये किती ऑफलाईन आणि किती ऑनलाईन सेवा दिल्या जातात, याबाबतची तालुकानिहाय माहिती द्यावी. अपवादात्मक ठिकाणी ऑफलाईन सुविधा असावी. पीएम आवास योजना घरकुलाच्या संदर्भात एकाही व्यक्तीला वसुलीचे पत्र जायला नको. त्याला पुढचे हप्ते कसे मिळतील, यावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. जल जीवन मिशन संदर्भात कंत्राटदारांसोबत तालुकास्तरावर आढावा बैठक घ्याव्यात. महावितरण आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागांने समन्वय बैठक घेऊन प्रलंबित 50 नळपाणी योजना मार्गी लावाव्यात. कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा करु नये. जल जीवन मिशन प्रधानमंत्र्यांचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे. याबद्दल तक्रारी येता कामा नयेत, याची दक्षता घ्यावी. सर्व कार्यालयांनी ई ऑफीस प्रणाली लागू करावी. पोलीस विभागाने एमपीडीएबाबतची कारवाई वाढवावी. सर्वसामान्यांच्या योजना राबविण्यासाठी अधिकाऱ्यांचा पुढाकार हवा, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.