(दापोली)
खूप वाचन करा, पण संयम हा फक्त ग्रंथ वाचनानेच मिळतो असे मनोगत दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी बुधवार दि.४ सप्टे.रोजी महावाचन उत्सव निमित्त आयोजीत ग्रंथप्रदर्शन महोत्सवात एन.के. वराडकर काॅलेज दापोली येथे मनोगत व्यक्त केले. प्राचार्य भारत कराड यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या ग्रंथोत्सव प्रसंगी प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सहा.गटविकास अधिकारी सुनिल खरात, गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, रानडे मॅडम, गोखले वाचनालयाच्या खरे आदि.व्यासपिठावर उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गट साधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती उपस्थित होते.
यावेळी वाचनाचे महत्व सांगतांना मंडलिक यांनी पुढे सांगितले की, वाचनाशिवाय तरणोपाय नाही. यापुढे बुकेंपेक्षा पुस्तकच भेट देण्याचा संकल्प करु. पुस्तके वाचली पाहिजेत,भेट दिले पाहिजेत. व्यक्तीमत्व विकासासाठी पुस्तक वाचन फार महत्वाचे. स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणा फक्त पुस्तकातूनच मिळते,आवडीच्या क्षेत्रात करियर करणेसाठीही वाचन खूपच महत्वाचे. पुस्तक प्रेरणा देतात, घडवतात, अन्नासारखेच वाचन संस्कृत्ती गरजेची आहे. दापोली आपली साहित्यिकांची भूमि,पूज्यसाने गुरुजींच्या पावन भुमितील अनेक नररत्नांच्या या खानीत अनेक साहित्यिक होऊन गेली. तो वारसा जपणेसाठी हल्लीचे कवी,साहित्यिक प्रयत्न करीत आहेत. साहित्याची परंपरा लाभलेल्या या भुमित हे ग्रंथ प्रदर्शन होत आहे, याचा लाभ सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी घ्यावा असेही त्यांनी पुढे सांगितले.
तर प्रास्ताविक करतांना गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी प्रास्ताविकात महावाचनाचा हा दुसरा टप्पा 22जुलै ते 31 आॅगस्ट शाळास्तरावर राबविला असून,वाचन महोत्सव दुसरा टप्पा यशस्वी होत असतांना या ग्रंथ महोत्सवामुळे बुध्दीला एक खुराक मिळेल. वाचन संस्कृती वाढावी, वाचनाचे महत्व कळावे या कामी हा ग्रंथ प्रपंच असल्याचे बळवंतराव यांनी वाचनाचे महत्व विषद केले. तसेच जावे पुस्तकांचे गावी या विषयी सांगत असतांना त्या गावातील पेठा,ह्या पुस्तकांच्या नावाने असल्याचे सांगितले. तसेच दापोली शहरातील सर्व काॅलेजकडून शिक्षण विभागाला चांगले सहकार्य लाभत असल्याचे बळवंतराव यांनी पुढे सांगितले.
तर सहाय्यक गट विकास अधिकारी सुनिल खरात यांनी ही संस्कार ग्रंथ व पुस्तक आपली व्यक्तीमत्व घडवतात, महान व्यक्तिंचं वाचन केल्याने आपण कोण आहोत, तसेच आपले कोतेपण दिसून येते.अग्रलेख वाचले तर आपण अग्रेसर राहू. व्यक्तीमत्व विकास होणेसाठी आपण काय वाचले पाहिजे हे समजून आले आणि आपण वाचन संस्कृती जोपासली तर आपल्याला काही कमी पडणार नाही, अशा शुभेच्छा दिल्या. तर विद्यार्थी श्रीराम आगरकर याने भारतीय संस्कृतीमध्ये स्री सन्मान फार पूर्वीपासूनच आहे. अन्न, वस्त्र, निवारा या गरजांसह बुध्दी,धन,शक्ती यांचीही गरज महत्वाची असते. अर्थात सरस्वती,लक्ष्मी आणि दुर्गा अशा स्त्री देवतामुळे स्री सन्मान मिळतो. स्री सन्मानापेक्षा पुरुष मर्यादा समजणे गरजेचे आहे असे त्याने मत मांडले.
तर अध्यक्षीय मनोगतात, महावाचन महोत्सव म्हणजे, पुस्तकांचा सहवास,विश्वाचा प्रवास ” मुलांनी वाचावं हे योग्यच आहे; पण काय वाचावं हे माहीत असणे गरजेचे आहे. हे द्यायचे असेल तर अधिकचं द्यावे. यासाठी कृत्रीम बुध्दिमत्ता सहाय्यकही मदत करु शकतो.मुलांना मोबाईलमधून बाहेर काढा, आणि वाचन करणेस प्रेरित करा.तंत्रज्ञानातून नवनिर्मिती होत नाही,जे आहे तेच त्यातून मिळते;पण आपण त्यामध्ये भर घालून मुलांना वाचन प्रेमी करा. असा सल्लाही अध्यक्ष भारत कराड यांनी दिला.
पूर्ण सोहळ्याचे सुत्रसंचालन दापोलीतील प्रथीतयश लेखक पदवीधर शिक्षक बाबू घाडीगावकर यांनी केले.
या ग्रंथ प्रदर्शनात गोखले ग्रंथालय, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, म.कर्वे हायस्कूल मुरूड, ए.जी.हायस्कूल,बुटाला हायस्कूल गावतळे, एन.के.वराडकर काॅलेज, माटवण हायस्कूल आदि ठिकाणाहून ग्रंथ प्रदर्शनात मांडले होते. शेकडो पुस्तके, ग्रंथ यांची मेजवाणीच जणू वाचकांना मिळाली. शहरातील सर्व शाळा काॅलेज यांचेसह तालुक्यातील असंख्य विद्यार्थी आणि शिक्षक यांनी या महोत्सवास भेट दिली. सोहळा यशस्वी करणेसाठी गटसमन्वयक साधन व्यक्तिंचे विशेष सहकार्य लाभले.