( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रतिकृती प्रत ठेवण्यात आली होती. एका माथेफिरुने संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना केली. संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर परभणी शहरासह आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, रत्नागिरी जिल्हा तालुका स्तरावर, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदने सादर करण्यात येत आहे.
वंचित बहुजन आघाडीने देखील रत्नागिरीत यापूर्वी घडलेल्या घटनांचा उल्लेख करत परभणी येथील भारतीय संविधान प्रतिकृतीची जातीयवादी द्वेषातून करण्यात आलेल्या घटनेचा रत्नागिरी जिल्ह्यातील संविधानवादी जनतेच्या वतीने तसेच आंबेडकरी समाज आणि वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्ह्याच्या (दक्षिण) वतीने तिव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच संबंधित गुन्हेगाराने संविधानाच्या प्रतीकृतीचा अवमान करून राष्ट्र विरोधी कृत्यं केले आहे. आणि त्या गुन्हेगारा विरोधात राष्ट्रविरोधी कायद्यानुसार कटोरपणे कारवाई करण्यात यावी अशी आम्ही जनतेच्या वतीने शासनाकडे मागणी करीत असल्याचे निवेदन शुक्रवारी, १३ डिसेंबर २०२४ रोजी बोरकर साहेब ( उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग) यांच्याकडे देण्यात आले आहे.
यापुढे, राष्ट्र निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकरां बद्दल जातीय द्वेष भावनेतून रत्नागिरी जिल्ह्यात देखील या पुर्वी अनेकदा अवमानाच्या अनुचित घटना घडल्या आहेत. अथवा घडवून आणल्या गेल्या आहेत. मग ते जिएसटी कार्यालयाच्या मुख्याधिका-यांच्या दालनातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या तस्वीरीची करण्यात आलेली विटंबना असो अथवा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा आवारात करण्यात आलेली नासधूस असो. या सर्व प्रकरणांत एकतर पोलीस प्रशासनाला याचा छडा लावण्यात अपयश आले आहे. अथवा पोलीस प्रशासनानेच आरोपींना मानसिक रूग्ण ठरवून या अनुचित घटनांकडे दुर्लक्ष केले आहे. एकाही आरोपीला कायद्याच्या चौकटीत योग्य ते शासन झालेले नाही. ज्यामुळे असे प्रकार करणा-यांना, घटना घडवून आणणा- यांचे मनोधैर्य वाढले आहे. जे सामाजिक धार्मिक सलोख्यासाठी धोकादायक ठरणारे आहे. असे निवेदन नमूद करण्यात आले आहे.
अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी…
निवेदना द्वारे आपणास सुचीत करू इच्छितो की, परभणी येथे घडलेली राष्ट्र विरोधी, समाज विरोधी अनुचित घटना लक्षात घेऊन. तसेच रत्नागिरी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आजवर झालेल्या अवमानाच्या घटनांची दखल घेऊन. रत्नागिरी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपणं आपल्या अधिपत्याखाली योग्य ती व्यवस्था, कारवाई करावी अशी मागणी रत्नागिरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
सलोख्याचे वातावरण निर्माण करावे
पुन्हा एकदा या निवेदनाद्वारे रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने शासनाच्या निदर्शनास आणून देऊं इच्छितो की, परभणी घटनेतील आरोपीला कठोरातील कठोर कारवाई करून अन्य आरोपीचा शोध घ्यावा अशा समाज विघातक वृर्तीना पायबंद घालण्यात यावा. आणि सामाजिक शांतता, सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यात यावे. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सादर केलेले निवेदन बोरकर साहेब (उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग) यांनी स्वीकारले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्हा व तालुका पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष लवेश कांबळे, जिल्हा महासचिव मुकुंद सावंत, तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, तालुका महासचिव प्रतिक कदम, राजेंद्र जाधव,यशवंत सावंत, सचिव बिपिन आयरे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभाग प्रमुख विजय जाधव, भा. बौ. म. माजी तालुकाध्यक्ष रत्नदीप कांबळे आदी उपस्थित होते.