(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे राज्य शासनाने सक्तीचे केले असतानाही ५० टक्के शिक्षकांनी या आदेशाला हरताळ फासला आहे. जिल्ह्यातील ३ हजार २८८ प्राथमिक शिक्षक मुख्यालयी राहात असल्याचे ठरावच उपलब्ध झालेले नाहीत. मुख्यालयी न राहताही हे शिक्षक घरभाडे मात्र घेत आहेत आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागामध्ये सेवा देणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक हे शाळा असलेल्या ठिकाणी राहत नसल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याची ओरड नेहमीच सुरू असते. शिक्षकांनी गावातच राहावे, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थ करतात; परंतु कौटुंबिक कारणामुळे नोकरीच्या ठिकाणी न राहता अनेक शिक्षक शहरात राहतात आणि दररोज ये-जा करतात. याचा विपरित परिणाम संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण आणि गुणवत्तेवर होत आहे. तसेच शासनाची आर्थिक लूट होतानाही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिक्षक आणि ग्रामसेवक नोकरीच्या ठिकाणी का राहू इच्छित नाहीत, याचा अभ्यास करण्यासाठी पंचायत राज समिती नेमली होती. या समितीने यासंबंधी अहवाल सादर केल्यानंतर ग्रामविकास विभागाने एक अधिसूचना जारी करून शिक्षक, ग्रामसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा मुख्यालयी राहणे बंधनकारक केले. शासन परिपत्रक दि. ९ सप्टेंबर २०१९ नुसार शिक्षक, ग्रामसेवक मुख्यालयी राहत असल्याबाबतचा ग्रामसभा ठराव बंधनकारक असूनही २०१९ ते २०२४ पर्यंत काही प्रमाणात ग्रामसभांचे दाखले आहेत. २०१९ ते २०२२पर्यंत मात्र एकही ग्रामसभा ठराव उपलब्ध होऊ शकला नाही. हजारो घरभाडे भत्ता मात्र शिक्षकांनी घेतल्याचे माहितीच्या अधिकारात घेण्यात आलेल्या माहितीमध्ये समोर आले आहे. देता परमीतीच्या सुमार केल्यास दोन वर्षांतील कोट्यवधी रुपये जिल्हा परिषदेच्या तिजोरीत परत येतील. जिल्ह्यातील ३ हजार २८८ शिक्षक मुख्यालयी राहात असल्याचे ग्रामपंचायतींचे ठराव उपलब्ध झालेले नाहीत. यामध्ये रत्नागिरी तालुक्याची माहिती उपलब्ध झालेली नाही.
मुख्यलयी बाबत तालुकानिहाय जर माहिती पहिली असता गटशिक्षणाधिकारी यांच्या पत्रानुसार ….
तालुका मंडणगड एकूण शिक्षक २८७ पैकी २३१ ठराव नाही, दापोली एकूण ५४६ पैकी ३४३, खेड एकूण ८२१ पैकी ५९३, चिपळूण एकूण ७९० पैकी २२५, गुहागर एकूण ३९० पैकी ३९०, संगमेश्वर एकूण ६८४ पैकी ५३९, लांजा एकूण ४५१ पैकी १५४, आणि राजापूर ८१३ पैकी ८१३ इत्यादी एकूण आठ तालुक्याची माहिती उपलब्ध आहे.