(गणपतीपुळे / वैभव पवार)
तालुक्यातील कळझोंडी येथे युवा परिवर्तन संस्थेतर्फे महिलांसाठी पापड मेकिंग कोर्स आयोजित करण्यात आला होता. या कोर्समध्ये महिलांना पापड बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये युवा परिवर्तन संस्थेतील प्रशिक्षक नाझपरवीन परदेशी, क्षेत्र व्यवस्थापक वृषाली सुर्वे, रिटेल सेल्स असोसिएट ट्रेनर तथा कौन्सिलर आफशा परदेशी, एरिया मॅनेजर वैभव कांबळे आदींचे मोलाचे मागदर्शन लाभले.
महिलांना स्वावलंबी बनता यावे या उद्देशाने पापड व्यवसायाबाबत प्राशिक्षण देण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कळझोंडी पंचशीलनगर येथील दिवंगत गोविंद गोजू पवार यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या सभागृहात कळझोंडी पंचशीलनगर येथील महिला स्वयंसहायता बचत गटाच्या महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. एकूण ५ दिवस आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणात सर्व महिलांनी एकत्र येऊन आणि मोठी मेहनत घेऊन पापड प्रशिक्षण पूर्ण केले.
या प्रशिक्षणातील आनंददायी कामांबाबत महिलांनी समाधान व्यक्त केले. तसेच प्रशिक्षण देणा-या महिला भगिनींचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी विशेष आभार मानले. या प्रशिक्षणातून महिलाना रोजगाराची नवी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे कळझोंडी येथील महिला स्वयंसहायता बचत गट महिलांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात समाधान व हास्य फुलले आहे.