(गणपतीपुळे / वैभव पवार)
कुणबी सेवा संघ दापोली जि. रत्नागिरी यांच्या वतीने दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांना पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृती सेवाव्रती उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार मागील अनेक वर्षे रत्नागिरीतील ग्रामीण भागात काम अत्यंत निःस्वार्थी भावनेने काम करणारे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेचे मुख्याध्यापक श्री. माधव विश्वनाथ अंकलगे यांना भारताचे माजी केंद्रीय मंत्री अनंतजी गीते यांच्या हस्ते आणि मराठी भाषेचे अभ्यासक डॉ. सुनील शिंदे यांच्यासह कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, उपाध्यक्ष तथा निवड समितीचे प्रमुख डॉ. प्रमोद सावंत, संस्थेचे सचिव हरिश्चंद्र कोकमकर, रत्नागिरी जिल्हा बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी गुरव, लेखक – संपादक हरिश्चंद्र गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत नवभारत छात्रालय दापोली येथील पांडुरंग शिंदे गुरुजी सभागृहात प्रदान करण्यात आला.
मागील अनेक वर्षे सातत्याने माधव अंकलगे यांनी शाळा विकास आणि विद्यार्थी गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम आपल्या शाळेत राबविले आहेत. त्यांनी आपल्या नोकरीच्या सेवेत विद्यार्थी गुणवत्ता विकास करतानाच पालक व समाज सहभाग यांच्या माध्यमातून व आपल्या सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने दोन्ही शाळा ह्या आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त बनविल्या आहेत. त्यासोबतच मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक उठाव करत शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्यातून ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करत असतात. विविध स्पर्धा, वाचन – लेखन उपक्रम, स्पर्धा परीक्षा, आपत्कालीन काळातील सेवा, ग्रामीण व शहरी भागातील प्रबोधन, विविध शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी घेतलेला पुढाकार, विद्यार्थ्यांसोबतच स्वतःची शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, साक्षरता अभियानातील सहभाग, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धन, विविध स्पर्धामधील विद्यार्थी सहभाग, त्यांचे यश या सर्व बाबीचा विचार करून निवड समितीने त्यांची निवड या पुरस्कारासाठी जाहीर केली होती. परसबाग, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, शिक्षण सप्ताह, यासह विविध शैक्षणिक उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे. यासह विविध विषयांवर त्यांनी लेखन करतानाच वेगवेगळ्या ठिकाणी करिअर मार्गदर्शन, पालक प्रबोधन, विद्यार्थी मार्गदर्शन, विविध अभियाने, प्रशिक्षणे यामध्ये व्याख्याने दिली आहेत.
पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कार निवड समितीने माधव अंकलगे यांच्या कार्याची माहिती घेऊन प्रत्यक्ष शाळेला भेट देत कार्याबद्दलची खातरजमा केली आणि या भेटीदरम्यान त्यांनी शाळा विकास आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास पाहून त्याबाबत प्रभावित होऊन निवड समितीने त्यांना पुरस्कार जाहीर केला होता. त्यानुसार पूज्य सामंत गुरुजी आणि प्रभाकर शिंदे गुरुजी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी माधव अंकलगे यांच्यासोबत कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीचे अध्यक्ष चेतन राणे यांच्यासह विविध पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी पांडुरंग तेरेकर, केसरकर सर, पी. डी. ठोंबरे, खजिनदार प्रदिप इप्ते, यांच्यासह कुणबी सेवा संघाचे पदाधिकारी व सदस्य, नवभारत छात्रालयाचे विद्यार्थी, कर्मचारी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
माधव विश्वनाथ अंकलगे यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारासाठी त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.