(चिपळूण)
देशातील प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ आणि उद्योजक, पद्मश्री डॉ. के. एच. घरडा यांचे सोमवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. ते घरडा केमिकल्स लिमिटेडचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते, ज्यांनी त्यांच्या R&D आधारित दृष्टिकोनातून भारतात अनेक नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादने सादर केली. घरडा यांच्या निधनाने उद्योग जगतात शोककाळा पसरली आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांनी 40 वर्षांपूर्वी घरडा केमिकल्स लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. कृषी रसायनामध्ये ही कंपनी कार्यरत असून, या क्षेत्रात त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. त्यामुळे त्यांना शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. डॉ. घरडा यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांचा सन्मान झालेला आहे.
लोटे आणि चिपळूण परिसरात त्यांनी घरडा फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले. आजही त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत. लवेल येथे घरडा रुग्णालय देखील त्यांनी उभे केले आहे. या कंपनीने लोटे आणि डोंबिवली येथे कार्यविस्तार केला. मुंबईतील वांद्रे येथे त्यांचे मुख्य कार्यालय आहे. या शिवाय गुजरातमध्ये देखील या व्यवसायाचा पसारा वाढला आहे.
डॉ. केकी होर्मुसजी घरडा यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून रसायन अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि ओक्लाहोमा विद्यापीठातून रसायनशास्त्रात पीएचडीची पदवी प्राप्त केली. भारतात परतल्यावर, डॉ. घरडा यांनी घरडा केमिकल्सची स्थापना केली, जी आज भारतातील सर्वात मोठ्या कृषी रसायन कंपन्यांपैकी एक आहे.
रसायनशास्त्र आणि रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्टचा ‘केमिकल पायोनियर’ पुरस्कार मिळाला. याव्यतिरिक्त, त्यांना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) कडून ‘संशोधन आणि तंत्रज्ञान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
घरडा केमिकल्स लिमिटेडची स्थापना १९६७ मध्ये झाली आणि आज ती चार उत्पादन युनिट्स असलेली संशोधन-आधारित कंपनी आहे. कंपनीने नावीन्यपूर्ण आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यामुळे भारतातील कृषी रसायन क्षेत्रात तिचे मजबूत अस्तित्व निर्माण झाले आहे. डॉ. के. एच. घरडा यांच्या दूरदृष्टी आणि समर्पणाने घरडा केमिकल्सला एक यशस्वी आणि नामांकित कंपनी म्हणून विकसित केले.
तसेच घरडा फाउंडेशन च्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजाला दिशा देण्याचे काम केले. घरडा हॉस्पिटल उभारून रुग्णांना सेवा देण्याचे काम झाले. तसेच घरडा कॉलेज लवेल ही शैक्षणिक संस्था सुरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची कवाडे खुली करून दिली आहेत. एकंदरीत उद्योग क्षेत्रासह डॉ. घरडा यांचे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात योगदान राहिले आहे. यामुळे त्यांच्या निधनाने उद्योग जगताचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले आहे.