(राजापूर / वार्ताहर)
राजापूर पूर्व भागातील ओणी व पाचल परिसरात गेल्या तीन दिवसापासून वीज पुरवठा खंडित असल्याने परिसरातील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तीन दिवस उलटून गेले तरी विजपुरवठा सुरळीत करण्यास अयशस्वी झालेल्या पाचल महावितरण शाखा उपभियंता यांच्याबद्दल जनतेच्या मनात संताप व्यक्त होताना आज पाचल बाजारपेठेत दिसला.
गेले तीन दिवस पाचल सारख्या मोठ्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांचे जास्त प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं आहे. बेकरी चे पदार्थ, आईसक्रीम, कोल्ड्रिंग, दुध, हॉटेल्स यावर जास्त प्रमाणात नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच नवरात्रौत्सव साजरा करणाऱ्या मंडळानी अनेक कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले होते. परंतू विजेमुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने अनेक मंडळाना लाखो रुपयाचे नुकसान सहन करावं लागलं आहे.
याबाबत आज सायंकाळी पाचल बाजार पेठेतील अनेक व्यापारी आणि ग्रामस्थ पाचल बस स्थानकजवळ एकत्र येऊन पाचल महावितरण शाखा उपभियंता संदीप बंडगर यांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्न उपस्थित करून पोलिसांत याबाबत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याच्या मार्गांवर होते. गेल्या तीन दिवसापासून लाईट नसल्याने लोकं हैराण झाली आहेत. मात्र याबाबत वारंवार विचारणा केली तरी पाचल महावितरण शाखा उपाभियंता संदीप बंडगर यांनी “33 KV पाचल वाहिनीवर ओणी पारेशन सबस्टेशन येथे अजूनही काम सुरु आहे. काम लवकरात लवकर संपले की वाहिनी सुरु केली जाईल. तसेच शाखा कार्यालय अंतर्गत पाटीलवाडी जवळ 33 KV लाईनवरील disc faulty आहेत, त्या अडचणीच्या ठिकाणी असल्याने सौन्दळ स्टाफला रात्री 12 वाजता बदलता नाही आल्या, त्या बदलल्यावर पुढील लाईन सुरु होईल, तसेच 11 KV back फिडरवर वीज पुरवठा अजिवली पर्यंत सुरु केलेला होता परंतु पाटिलवाडी जवळच पुन्हा रात्री नादुरुस्त होऊन खंडित झाला आहे. सौन्दळ स्टाफ लवकरच लाईनवर काम सुरु करेल. त्यांच्या भागातील लाईन सुरु झाली की पुढील पाचल भागही सुरु केला जाईल” अशी उत्तरं सोशल मीडियावर दिली आहेत.
विजेच्या त्रासाला कंटाळून हैराण झालेल्या जनतेने सदर अभियंता किंव्हा कर्मचारी यांना कॉल करायचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याने तसेच लाईट केंव्हा येईल या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने अखेर आज सायंकाळी पाचल बाजारपेठेत बस थांबा येथे संदीप बंडगर यांच्या कार्यपद्धतीवर जनतेचा उद्रेक पहायला मिळाला. जर विजेचा प्रश्न लवकर सोडवता आला नाही तर पाचल महावितरण शाखा उपाभियंता यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा सतर्क इशारा परिसरातील संतप्त जनतेकडून देण्यात आला आहे.