(मुंबई)
कल्याणमधील रेतीबंदर, दूधनाका परिसरात मोठ्या प्रमाणात म्हशींचे तबेले आहेत. या भागात खुल्या दूधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. कल्याणमधून लाखो लीटर दुधाची विक्री होते. मोठ्या कंपन्या आणि मिठाई तयार करणाऱ्या हलवायांना दूध पुरविले जाते. मात्र असा प्रकार समोर आला आहे. जे ऐकून नागरीकांना धक्का बसला आहे. कल्याण क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील बिसमिल्लाह हॉटेल परिसरात एका घरावर छापा टाकला. यामध्ये पोलिस कर्मचारी गुरुनाथ जरक, विलास कडू, बालाजी शिंदे, उमेश जाधव, सचिन वानखेडे आणि अनुप कामत हे कर्मचारी सहभागी होते.
एका घरातून इंजेक्शनचा मोठा साठा जप्त केला आहे. ऑक्सिटोसीन इंजेक्शन हे म्हशीला जास्त दूध यावे याकरीता दिले जाते. हे दूध मानवी शरीरासाठी अतिशय हानीकारक आहे. तसेच म्हशींच्या आरोग्याकरीता हानीकारक आहे. जास्त नफा कमाविण्याच्या नादात दूध व्यावसायिक हे धंदे करीत आहेत. त्यांनी हा धंदा सुरु केला आहे. या दूधाच्या सेवनामुळे मुलांच्या शरीरातील हार्मोन्सवर विपरित परिमाण होतो. आत्ता क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी मोठा साठा जप्त करीत मशीद सादीक खाेत याच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. हे इंजेक्शन कोणत्या आणि किती तबेल्यातून म्हशींना दिले जाते. त्याची विक्री कोण करीत आहे. ते कुठून आणले जात आहे. यामध्ये कोण व्यक्ती सामील आहेत याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
काय आहे ऑक्सिटोसिन ?
ऑक्सिटोसिन हे मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीत तयार होणारे आणि तेथेच साठवले जाणारे हार्मोन आहे. महिलांमध्ये प्रसूती वेदना वाढवून गर्भपिशवीचे तोंड उघडण्यासाठी स्टिम्युलेटर म्हणून या हार्मोनचा वापर डॉक्टर करतात. तसेच दूध येण्यासाठी उत्पे्ररक म्हणूनही ते काम करते.
कठोर शिक्षेची तरतूद
ऑक्सिटोसिनची विनाप्रिस्क्रिप्शन विक्री करणा-या औषध विक्रेत्याचा परवाना रद्द होऊ शकतो. विक्रेत्यास 5 वर्षे कारावास व आर्थिक दंड किंवा दोन्हीही होऊ शकते. ऑक्सिटोसिनचा वापर करणा-या पशुपालकांना 1 ते 3 वर्षे कारावास व आर्थिक दंडाची तरतूद आहे; पण त्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून तक्रार करण्याची आवश्यकता आहे