(लांजा)
तालुक्यातील पालू येथे कै. गणपत रामचंद्र गाडे यांच्या स्मरणार्थ दि. १३ जुलै रोजी राज्यस्तरीय चिखल नांगरणी व भात लावणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे तिसरे वर्ष असून, स्पर्धा कै. गणपत रामचंद्र गाडे यांच्या स्मरणार्थ पालूचे उपसरपंच यांनी आयोजित केली आहे.
ही स्पर्धा १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार असून, चिखल नांगरणी व भात लावणी स्पर्धा पालू येथील देवमळा या ठिकाणी होणार आहे. स्पर्धा बाजारी व गावठी बैल या दोन प्रकारामध्ये होणार आहे. स्पर्धेत बाजारी गटात प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला रोख रक्कम रुपये ११ हजार व ढाल, द्वितीय रु. ७ हजार, तृतीय रु. ४ हजार, चतुर्थ रु. ३ हजार, पाचवा क्रमांक रु. २ हजार, सहावा रु. १ हजार तर सातवा, आठवा, नववा आणि दहावा क्रमांक मिळणाऱ्या स्पर्धकाला आकर्षक ढाल मिळणार आहे.
गावठी बैल या प्रकारात प्रथम पटकावणाऱ्या स्पर्धकाला रुपये ७ हजार, द्वितीय रु. ५ हजार, तृतीय रु. ४ हजार, चतुर्थ रु.३ हजार, पाचवा क्रमांक रु. २ हजार, सहावा रु. १ हजार व प्रत्येकी ढाल तर सातवा, आठवा, नववा, दहावा क्रमांकाला प्रत्येकी ढाल देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी उपसरपंच सागर गाडे, अमोल झोरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.