(मुंबई)
मुंबई येथील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या तानावडे कुटुंबाने आपल्या 12 वर्षांच्या मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चार जणांचे प्राण वाचण्यात यश आले आहे. वय वर्षे अवघे 12 असलेली मुलगी वैदेही तानावडे हिस परळ येथील बाई जेरबाई वाडिया रूग्णालयात सोमवारी (15 जुलै) रोजी ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्याबाबत डॉक्टरांकडून माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या नि:स्वार्थी कृतीमुळे शेवटच्या टप्प्यातील अवयव निकामी झालेल्या चार मुलांचे प्राण वाचले.
ITP आजाराचे निदान
ब्रेनडेड घोषित करण्यात आलेल्या वैदेही हिस इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिक पुरपुरा (Idiopathic Thrombocytopenic Purpura) नावाच्या दुर्मिळ स्वयंप्रतिकार विकाराचे निदान झाले. हा विकार रोगप्रतिकारक यंत्रणा, रक्त गोठवणाऱ्या प्लेटलेट्सचा (पेशी) नाश करते. त्यामुळे या विकाराची बाधा झाल्यानंतर शरीरातील रक्त योग्य प्रमाणात जमत नाही. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने प्रकृती खालावली
वैदेहीचे वडील भाऊ तानावडे यांनी सांगितले की, “माझी मुलगी 9 वर्षांची होईपर्यंत बरी होती. त्यानंतर तिला आयटीपीचे निदान झाले. तिच्यावरील उपचारांसाठी आम्हाला मुंबई येथील वाडिया हॉस्पिटलमध्ये अनेकदा जावे लागले. विविध उपाचार करुनही ती सातत्याने अस्वस्थ आणि थकलेलीच राहिली. पुढे तिची प्रकृती अधिकच खालावली. अखेर डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषीत केले.” भाऊ तानवडे यांनी पुढे सांगितले की, ” वैदेहीला शनिवारी (13 जुलै) सकाळी नेहमीप्रमाणे झोपेतून जाग आली. त्यानंतर तिला काही वेळात रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. “आम्ही तिला रुग्णालयात नेले. रुग्णालयात करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये तिला मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले,” त्यानंतर तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.
अवयव दान करणाऱ्या मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया
“गेल्या तीन वर्षांत वाडिया हॉस्पिटलला भेट देताना, आम्ही अनेक मुलांना अनेक समस्यांनी ग्रासलेले पाहिले आहे. त्यामुळे वैदेही तर आता मृत्यूशय्येवर होती. असे असताना आम्ही इतर मुलांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही वैदेहीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला,” असे भाऊ तानावडे यांनी सांगितले.