(मंडणगड)
कर्ज फेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी मंडणगड येथील कै. सौ. सावित्रीबाई भागोजी निमदे कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे कर्जदार शिरीष महादेव दिवेकर याला एक लाखाचा दंड आणि दोन महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. मंडणगड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ही शिक्षा ठोठावली आहे.
कै. सौ. सावित्रीबाई भागोजी निमदे कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून शिरीष दिवेकर याने कर्ज घेतले होते. या कर्ज फेडीपोटी त्याने पतसंस्थेच्या नावाने ७१,११७/- रुपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश न वटल्याने त्याच्या विरोधात पतसंस्थेने न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी शिरीष दिवेकर याला मंडणगडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी याप्रकरणी एक लाख रुपये दंड, तसेच दोन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न दिल्यास १ महिना जादा साधा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पतसंस्थेमार्फत ॲड. सचिन बेर्डे व ॲड. अमोल बैकर यांनी काम पाहिले.