(सातारा)
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून गेल्याबद्दल मला अपराधी वाटते; परंतु आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि सुरक्षेसाठी मी असे केले, असे प्रतिपादन अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी रविवारी केले. फलटण येथे आपल्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ऐन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी शरद पवार यांच्याशी संबंध तोडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांचे निकटवर्तीय साताऱ्यातील नेते अजित पवारांसोबत गेले. मात्र, फलटणच्या रामराजे नाईक-निंबाळकरांनी भाजपा नेत्यांच्या त्रासामुळे पुन्हा स्वगृही परतण्याचे संकेत दिले आहेत. काल फलटण येथे त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले. रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पुढचा निर्णय काय घ्यायचा? असा सवाल केला. यावेळी कार्यकर्त्यांमधून ‘तुतारी’ साठी जल्लोष झाला. यावेळी बोलताना नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर टीका केली.
माजी जलसंपदा मंत्री आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे १९९५ ला आमदार झाले. तेव्हापासून २०१९ पर्यंत ते मंत्रिमंडळात होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर गेले. “विधानपरिषदेचे सभापती असतानादेखील मला तुरूंगात टाकायची तयारी रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरेंनी केली होती,” असा गौप्यस्फोट रामराजेंनी जाहीर सभेत केला. “ही बाब मी देवेंद्र फडणवीसांनाही सांगितली होती. अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतरही भाजपानं निंबाळकर, गोरेंना समज दिली नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आणि अस्वस्थ आहेत.” असे ते म्हणाले.
मी शरद पवारांना देव मानतो. तेवढंच अजितदादांनाही मानतो. अजितदादांमधील गुण आणि भविष्याचा विचार करून आपण निर्णय घेतला. परंतु, माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे तर आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंद जोपर्यंत सुरक्षित राहत नाही, तोपर्यंत आपलं महायुतीशी जमणार नाही,” असंही रामराजेंनी सांगून टाकलं.