(तरवळ /अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मराठा सेवा संघ जाकादेवी यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती निवळी येथील माहेर संस्थेत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात येथील अनाथ बांधवांच्या उपस्थितीत साजरी केली.
मराठा सेवा संघ जाकादेवी यांच्या मार्फत दरवर्षी शिवजयंती कार्यक्रम भव्य दिव्य अशा स्वरूपात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतू यंदाच्या वर्षी शिवप्रेमी बांधवांनी मिरवणूक न काढता शिवजयंती उत्सव माहेर संस्था निवळी येथे येथील अनाथ बांधवांच्या उपस्थितीत साजरा केला व समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिला. फक्त मोठमोठ्या मिरवणूका काढून भाषण देऊन अनाठायी खर्च करून जयंती साजरी करण्यापेक्षा ज्यांना कोणीच नाही अशा या अनाथ बांधवांबरोबर जयंती साजरी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श समाजापुढे घालून दिलेला आहे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण या निमित्ताने या वेळी पाहायला मिळाले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेचे व पुतळ्याचे पूजन माहेर संस्थेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते करून व जिजाऊ वंदना गाऊन करण्यात आले. संघाचे सदस्य श्री. विक्रम पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग श्रोत्यासमोर उभे केले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा थोडक्यात आढावा घेतला.
मराठा सेवा संघ जाकादेवी यांच्या वतीने माहेर संस्थेस श्रीनाथ सेल्स खेडशी यांच्या मार्फत खास शिवजयंती निमित्त माहेरसाठी डिस्काउंट दिलेली घरघंटी (पीठ गिरण)भेट दिली. तसेच माहेर संस्थेतील या अनाथ बंधू भगिनींना ११५ वडापाव दिले. शिवजयंती निमित्त मराठा सेवा संघाचे प्रमुख पदाधिकारी, सदस्य व सर्व धर्मीय शिवप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय असा समाजोपयोगी उपक्रम राबविल्यामुळे मराठा सेवा संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी संघाच्या वतीने माहेर संस्थेचे प्रमुख श्री. कांबळे व शितल मॅडम यांनी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले. शिवजयंतीचा हा कार्यक्रम मराठा सेवा संघ जाकादेवी यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माहेर संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.