(रत्नागिरी)
ओमानच्या आखाताजवळ एक तेलवाहू जहाज बुडाल्यामुळे १६ जण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये १३ भारतीय खलाशी आहेत. त्यात एक संगमेश्वर तालुक्यातील ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश असल्याचे समजते. सोमवारी सायंकाळी हे जहाज बुडाले. कोमोरोजचा ध्वज असलेले हे जहाज मंगळवारी ओमानच्या किनाऱ्याजवळ डुक्मच्या विलायतमधील रास मद्राकाच्या आग्नेयेला २५ सागरी मैलांवर असताना बुडाले.
सर्व माध्यमांद्वारे बुडालेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र ४८ तास उलटून गेल्यानंतरही बेपत्ता झालेल्यांचा पत्ता लागलेला नाही. या १३ कर्मचाऱ्यांमध्ये कसबा येथील एका व्यक्तीचा समावेश आह. तो ज्या कंपनीन कामाला होता, त्या कंपनीकडून त्याच्या नातेवाईकांना या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. ही व्यक्ती अजून बेपत्ता असल्याचे कंपनीने कळवले असल्याचे समजते.
१६ खलाशांमध्ये १३ भारतीय
संबंधित अधिकृत संस्थांमधील समन्वयाने मदत आणि बचाव कामाला सुरुवात करण्यात आली आहे, असे ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने सांगितले. प्रेस्टिज फाल्कन असे बुडालेल्या जहाजाचे नाव होते. त्यावरील १६ खलाशांमध्ये १३ भारतीय आणि ३ श्रीलंकेचे खलाशी होते.
सर्व खलाशी अजूनही बेपत्ता
हे सर्व खलाशी अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. जहाज दुबईतील हमरिया बंदरातून निघाले होते आणि येमेनमधील एडन बंदराकडे जात होते. डुक्म पोर्ट हे ओमानच्या तेल आणि वायू खाण प्रकल्पांचे प्रमुख केंद्र आहे.