(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यात भारतीय घटनेचे निर्माते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत अवमानकारक घटना वारंवार घडत आहे. या घटनांबाबत रत्नागिरी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा असून या संदर्भात शनिवारी (दिनांक २३ मार्च २०२४) विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.
या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एकमेव पूर्णकृती पुतळा आहे. सद्यस्थितीत हा पुतळा रत्नागिरी नगरपरिषद रत्नागिरी यांचे हद्दीत असल्याने त्याची संपूर्ण देखभाल ते करीत असतात. मात्र त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. असे असल्यामुळे या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची अगर ठिकाणाची विटंबना समाजकंटकाकडून होत आहे अथवा तो जाणूनबुजून घडवून आणली जात आहे. मात्र याबाबत पोलीस यंत्रणेला माहिती मिळूनही त्यावर स्वतः कोणतीही कारवाई करीत असल्याचे दिसून येत नाही. डॉ. बाबासाहेबांच्या जागरुक अनुयायांनी अशा घटना घडल्यावर आवाज उठवल्यानंतर संबंधित असामीवर कारवाई केली जाते ह्या एकंदर गोष्टीचे आकलन होत नाही, खरंतर अशा घटना घडतात त्यावेळी तणाव वाढू नये म्हणून पोलीस खात्याने संबंधितावर तातडीने कठोर शिक्षा होईल अशाप्रकारचे गुन्हे दाखल केले पाहिजेत असे आमचे म्हणणे आहे. मात्र तसे होत नाही. गेल्या दोन-तीन महिन्यात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची अगर त्यांच्याबद्दल सोशल मिडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या राष्ट्रपुरुषासंदर्भात वादग्रस्त विधान केली जात आहे व हे प्रकार पुढे वाढत जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. असे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विविध घटनांमध्ये पोलिसांची कारवाईची भूमिकाच नाही…
यापुढे, दिनांक २९/०२/२०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यातील परिसराच्या येथील अगरबत्ती-मेणबत्ती स्टँडचे मोडतोड करण्यात आली व सदर आरोपीला पोलीसांनी घटनेचा कोणत्याही प्रकारचे पंचनामा न करता पकडलेल्या आरोपीला सोडून देण्यात आले. व त्याच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच भिमराव कांबळे जाकादेवी यांच्या चिरेखाणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डबर टाकून श्री. कोळवणकर याने त्यांचा व्यवसाय बंद पाडला त्याची देखील तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंदवून घेण्यात आलेली नाही. तसेच निवळी येथे माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त स्पीकर लावण्यात आला होता व त्या दिवशी संजय निवळकर नामक व्यक्तीने पोलीस ठाणे येथे फोन करून स्पीकर बंद करण्यास लावला व त्या गावातील माता रमाबाई आंबेडकर जयंती देखील होवू दिली नाही. तरी सदर संजय निवळकरवर ग्रामीण पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे रितसर तक्रार दिली होती. त्या व्यक्तीवर देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. असे ही नमूद करण्यात आले.
तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार
तसेच दोन दिवसांपूर्वी (दिनांक २०/०३/२०२४ ) रत्नागिरीमधील एका “स्वराज्य” या व्हॉट्सअप ग्रुपवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आहेत हे माहित असूनही समाजात असंतोष व तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने एक घटनेचा अपमान करणारी पोस्ट व्हायरल झाली. त्या पोस्टची माहिती पोलीसांना मिळाली होती मात्र त्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. शेवटी नेहमीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जागरुक अनुयायी व संघटना एकत्र येवून संबंधित शहर पोलीस स्टेशन येथे त्याच्या विरूध्द तक्रार देण्यासाठी गेलो असता तक्रार घेतली नाही. संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. तोरस्कर यांना भेटलो असता ‘आमच्याकडे हा विषय आला आहे, संबंधित पोस्ट करणाऱ्या असामीस बोलावून घेतो आणि माहिती घेवून कारवाई करतो,’ असे सांगितले.
पोलीसांकडून गुन्हेगाराला अभय देण्याचे काम
मात्र संबंधित असामीविरुध्द कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून पुन्हा एकदा सर्व संघटनांचे पदाधिकारी दि. २१/०३/२०२४ रोजी लेखी तक्रार देण्यासाठी गेले. त्यावेळीही संबंधित अधिकाऱ्यांनी तशाच प्रकारे उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र तक्रार दाखल करून घेतली नाही व दुसऱ्या दिवशी सकाळी ११.०० वाजेपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करतो असे सांगितले. मात्र दि. २२/०३/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजल्यानंतर चौकशीसाठी गेलो असता, त्याचेवर गुन्हा दाखल करता येणार नाही, वरिष्ठांकडून माहिती घेतो, अशा घटना घडतच असतात,’ अशाप्रकारची उत्तरे देवून गुन्हा करणाऱ्यास एकप्रकारे अभय देण्याचे काम संबंधित अधिकारी करीत आहेत असे आमचे म्हणणे असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोणाच्याही दबावाखाली न येता विजय मानेवर गुन्हा दाखल करा
अशा घटना घडून जर संबंधित असामी मोकाट सुटत असतील तर त्यास कोणाचा राजकीय आश्रय आहे का? किंवा संबंधित अधिकारी हे दबावाखाली काम करत आहे का? अशी शंका निर्माण होते. यास्तव दि. २०/०३/२०२४ रोजी झालेल्या प्रकाराबाबत संबंधित असामी श्री. विजय माने याचेवर संबंधित ‘स्वराज्य’ या व्हॉट्सअप ग्रुपवर कठोर कारवाई होण्याच्या दृष्टीने कोणाच्याही दबावाखाली न येता गुन्हा दाखल करावा अशी सुचना संबंधित शहर पोलीस ठाणे, रत्नागिरी यांना सूचित करण्यात येवो असे निवेदनात नमूद केले आहे.
पोलिस प्रशासनाला दिला इशारा
संबधित व्यक्तीवर कोणतीही कारवाई न केल्यास आंबेडकरी अनुयायांनी व संघटना कायदेशीर हक्कासाठी पोलीस प्रशासनाचे विरुध्द रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. त्यास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहिल, असा इशाराच विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
कारवाई करण्यासंदर्भात पोलीस महानिरीक्षक कोणत्या सूचना देणार?
दरम्यान या भेटीत विशेष पोलीस महानिरिक्षक दराडे यांना रत्नागिरी पोलिसांची प्रत्येक वेळेची भूमिका आंबेडकरी संघटनांच्या पदाधकाऱ्यांनी सडेतोड शब्दात सांगितली. विविध ठिकाणी घडलेल्या घटनांचे गांभीर्य दराडे यांच्या लगेच लक्षात आल्यानंतर त्यांनी उपस्थित बांधवांची समजूत काढून त्यांना सांगितले की, योग्य ती कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, तशा सूचना ही रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांना देणार असल्याचे यावेळी सांगितले. मात्र अशा वारंवार घडनाऱ्या घटनांमुळे रत्नागिरी पोलीस प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर येत असताना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ठोस भूमिका घेणे आवश्यक होते. मात्र त्यांच्याकडून कोणतीही भूमिका घेतली जात नसल्यामुळे समाजात असंतोषांचे वातावरण पसरलेले आहे. तसेच पोलिस प्रशासनावर ही अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. परंतु संबधितांवर कारवाई करण्यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक दराडे हे रत्नागिरी पोलीस अधीक्षकांना कोणत्या सूचना देतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.