(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे गोमानेवाडी येथे सिलेंडर गळतीने भाजलेल्या एका प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवार 7 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. बाळू सोमा बांबाडे (55, गोमानेवाडी, संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. या घटनेने गणपती आगमनाच्या दिवशीच बांबाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ऐन गणेशोत्सव काळावधीत शेंबवणे गावात शोककळा पसरली आहे.
वेळ आणि काळ एकत्र आले असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही, कारण बाळू बांबडे हे गणेश मूर्तीची भक्तीभावे पूजा करत असताना त्यांच्या पत्नी ह्या घरात सारवण करत होत्या. त्यांनी सारवण करताना त्यांचे पती बाळू बांबाडे यांना हाक मारून स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर बाजूला करण्यास सांगितले.
बाळू बांबाडे यांनी पत्नीने दिलेल्या हाकेला साद देत गॅस सिलेंडर बाजूला करण्यासाठी धाव घेत सिलेंडर बाजूला करत असताना अचानक त्यातून गॅस गळती सुरु होऊन आगीचा मोठा भडका उडाला. या भडक्यात बाळू बांबाडे हे 90 टक्के भाजून गंभीर जखमी झाले. गॅस गळती मुळे उडालेला भडका आणि घडलेल्या घटनेमुळे घरातील लोकांनी केलेला आरडाओरड या ठिकाणी आजुबाजूच्या लोकांनी धाव घेत. जखमी अवस्थेत असलेल्या बाळू बांबाडे यांना संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हालवण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच सकाळी 11 वाजता त्यांना मृत्यूने गाठलेच.
गणेशाच्या आगमनदिवशीच बाळू बांबाडे यांच्यावर काळाने घाला घालत बांबाडे कुटूंबातून हिरावून घेतल्याने बांबडे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ऐन गणेशोत्सवात घडलेल्या घटनेमुळे शेंबवणे गावांत शोककळा पसरली आहे.