(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गावर निवळी नजिक डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली.हा भीषण अपघात आज सोमवारी (दिनांक १ जुलै २०२४) दुपारी दिडच्या सुमारास घडला आहे. या अपघातात तीन मुली व ड्रायव्हर असे चारजण जखमी झाले असून जखमींना रत्नागिरी येथील रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून कासवाच्या गतीने सुरू आहे. या सुरू असलेल्या कामांमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. या भागात छोटे-मोठे अपघात होऊन किरकोळ किंवा गंभीर जखमी होत आहे. चिखलमय रस्त्यांमधून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र याचा प्रत्यय या अपघातातून आला पुन्हा एकदा आला आहे. चौपदरीकरणाचे काम करणारा डंपर चालक हा हातखंब्याच्या दिशेने येत होता. तसेच रिक्षा चालक शाळकरी मुलींना घेऊन खेडशीतून करबुडेच्या दिशेने जात होता. दरम्यान दुपारी दिडच्या सुमारास खड्डेबंबाळ रस्त्यांमधून वाट शोधावी लागणाऱ्या निवळी भागात डंपरने जोरदार रिक्षाला धडक दिली. या अपघातात 4 मुली जखमी झाल्या आहेत. यामध्ये श्वेता सुरेश धनावडे (वय १७), शर्वरी रमेश धनावडे (वय १६) जागृती श्रीपत धनावडे (१७, सर्व रा. करबुडे) अशी जखमी मुलींची नावे आहेत. डंपरने दिलेल्या धडकेत रिक्षाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. या अपघातात सुदैवाने रिक्षामधील शाळकरी मुली बचावल्या आहेत.
अपघाताची घटना घडताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी तात्काळ अपघाताची माहिती पोलिसांना दिली. व जखमी ३ मुलींना उपचारांसाठी तात्काळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविले. यातील एका मुलीच्या पायाला फॅक्चर झाल्याने तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारवांचीवाडी येथील ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल होऊन पुढील कार्यवाही सुरू आहे.
आरटीओ विभाग कारवाईची भूमिका घेणार?
मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे डंपर चालक ऐन पावसाळ्यात चिखलाच्या रस्त्यांमधून ही लहान गाड्यांची पर्वा न करता बेफाम वेगाने गाड्या चालवतात. वेगाने धावणाऱ्या डंपर चालकांवर संबंधित आरटीओ विभागाचा अंकुश राहिलेला नाही. ठेकेदार कंपनीचे सर्व डंपर चालक यूपी, बिहारचे आहेत. काही गाड्यांना नंबर प्लेट देखील नाहीत, हे डंपर चालक कोणत्याही नियमांना जुमानत नसल्याचे दिसून येते. यावर आरटीओ विभाग आता कारवाईची कोणती भूमिका घेणार हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.