( राजापूर / तुषार पाचलकर )
जनक राजा आणि विश्वामित्रानंतर राजर्षी हा सन्मान मिळवणारे छत्रपती शाहू महाराज हे खरेखुरे जनतेचे राजे होते. दुष्काळ आणि प्लेगच्या साथीत जनतेचे अश्रू पुसण्यासाठी त्यांनी आपला खजिना रिकामा केला. आपल्या संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू करून त्यांनी नवभारताची निर्मिती केली. जातीयेतेच्या निर्मूलनासाठी स्वतः कृतीतून प्रयत्न केले. शिक्षण, व्यापार, शेती, साहित्य, कला, औद्योगीकरण, सिंचन अशा सर्वच क्षेत्रात स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भरीव कामगिरी करून आपल्या प्रजेचे अश्रू पुसण्यासाठी संस्थानाचा खजिना रिकामा करणारा शाहू महाराजांसारखा राजा विरळाच असून अशा राजांचे विचार अंगीकृत करूया, असे आवाहन श्रीमती स्नेहल चव्हाण यांनी केले. त्या श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. येल्लुरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बी.टी. दाभाडे,प्रा. पी. पी. राठोड आदी मान्यवर होते.दीपप्रज्वलन करून शाहू महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून डॉ.बी.टी. दाभाडे यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले.आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. एम. ए. येल्लुरे यांनी ” महाराजांनी दबलेल्या, पिचलेल्या वर्गासाठी खूप मोठे काम केले. शिक्षणाची गंगा मुठभर लोकांच्या हाती होती, ती प्रत्येकाच्या घरापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. बहुजनांचे ते आधारवड होते. पाश्चात्य तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी आपल्या संस्थानात केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या बुद्धिमान महामानवाला त्यांनी शिष्यवृत्ती देऊन शिक्षणास मदत केली. अशा या लोकराज्याची कृतिशील विचारधारा आचरणात आणून त्यांच्या विचाराचे पाईक आपण बनुया, ” असे विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. टी.दाभाडे यांनी केले तर आभार प्रा.पी.पी.राठोड यांनी मांडले