( पाली / वार्ताहर )
पाली बाजारपेठेमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन चौपदरीकरण केलेल्या रस्त्याची उंची भराव टाकून वाढवल्याने त्याला समांतर उंचीची गटारे केलेली नसल्याने पाण्याला अडथळा होऊन त्याच्या दाबाने संरक्षक भिंत लगतच्या ईमारतीवर पडून पाण्याच्या लोटामुळे घराचे व दुकान गाळ्यांचे सामानासह मोठे नुकसान झाले आहे. या वेळी त्याठिकाणी कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. महसूल विभागाकडून नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्यात आले आहेत.
याबाबत पाली महसूल मंडळ कार्यालयातून देण्यात आलेली माहिती अशी की, तालुक्यातील पाली बाजारपेठेमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन चौपदरीकरण केलेल्या रस्त्याची उंची भराव टाकून वाढवल्याने त्याला समांतर उंचीची गटारे केलेली नसल्याने पाण्याला अडथळा होऊन त्याच्या दाबाने संरक्षक भिंत लगतच्या उमेश शिंदे यांच्या ईमारतीवर पडून पाण्याच्या लोटामुळे त्यांच्या घराचे व दुकान गाळ्यांचे सामानासह मोठे नुकसान झाले आहे. यामधे उमेश उदयसिंघ शिंदे यांचे दुकानांचे शटर, लाकडी रॅक असे ९३,००० रुपये,शालिनी बाबुराव दूरकर यांचे बियर शॉपीतील सहा रेफ्रिजरेटर, कपाट, टेबल फॅन, बियर बॉक्स, खाद्यपदार्थ असे मिळून ३,७०,५२० रुपये, ऐकनाथ नथुराम चव्हाण यांचे सलून मधील फर्निचर, मशीन, रॅक असे मिळून २२,००० रुपये,नितीन गोपीनाथ करंडे याचे दुकानातील इंजिन ऑईल, स्पेअर्स पार्ट, फर्निचर असे ४३,००० रुपये असे एकूण ५,२८,५२० रुपयांचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त ठिकाणी पाली महसूल मंडळ अधिकारी राकेश विलणकर, पाली सजा तलाठी शंकर सुळ, कोतवाल संतोष गराटे, पोलीस पाटील सुरेश गराटे, अमेय वेल्हाळ, ग्रा.पं. सदस्य श्रीकांत राऊत, अॅड सागर पाखरे यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे केले आहेत. तसेच मुंबई गोवा व मिऱ्या नागपूर या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्या दोन्ही कंत्राटदारांना येथे योग्य उंचीच्या गटारांची उपाययोजना करण्यासाठी सांगितले आहे.
फोटो :- पाली बाजारपेठेत अतिवृष्टीमुळे संरक्षक भिंत कोसळून झालेल्या नुकसानीची पाहणी करताना मंडळ अधिकारी राकेश विलणकर, तलाठी शंकर सूळ व ग्रामस्थ.