( रत्नागिरी )
रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातुन इच्छुकांपैकी कोणत्याही निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी द्यावी आम्ही जीवाची बाजी लावून त्याला निवडून आणु असा आत्मविश्वास युवासेना तालुका प्रमुख तथा शिवसेना शहर संघटक प्रसाद सावंत यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चे दरम्यान व्यक्त केला. मात्र मातोश्रीचा आदेश आमच्यासाठी प्रमाण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जेव्हा रत्नागिरी विधानसभेमध्ये गद्दारी झाली त्यावेळी अनेक निष्ठावंत शिवसेनेबरोबर थांबले. गद्दारी नंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आपण सर्व निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड दिला. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही टॉपवर राहिलो. लोकसभेला आम्हाला अपयश आले तरी विधानसभा क्षेत्रात पैशाचा महापुर येवूनही आपण 10 हजारच्यावर मताधिक्य घेतलं ते निष्ठावंताच्या जोरावर. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनात आपल्याच पक्षातील माणसाला उमेदवारी मिळावी अशी भावना असणे गैर नाही असेही प्रसाद सावंत यांनी सांगितले.
गद्दारी झाल्यानंतर येथील शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष आहे. या मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रचंड ताकद आहे, असे असताना बाहेरच्या उमेदवाराची पालखी खांद्यावर घेण्यापेक्षा आपल्या निष्ठावंतासाठी छातीचा कोट करू अशी भावना समस्त शिवसैनिकाची आहे असेही ते म्हणाले. युवक-युवती, तरुण-तरुणी यांच्या बरोबर ज्येष्ठ शिवसैनिक ग़द्दारीला प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहेत. कुठच्याही परिस्थितीत आम्ही ह्या विधानसभेवर भगवा फडकवणारच असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, माजी जिल्हाप्रमुख उदय बने, तालुका प्रमुख बंड्याशेठ साळवी आणि विधानसभा संपर्क प्रमुख सुदर्शन तोडणकर यांच्यापैकीच उमेदवार पक्षप्रमुख उद्धवजी आपण द्यावा अशी आपणास ह्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो असे सांगताना उद्धवजींचा आदेश आमच्यासाठी शिरसावद्य आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले.