(खेड)
संविधान बदलण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. असा अप्रचार वारंवार काँग्रेस करत आहे. मात्र, संविधान बदलण्याची ताकद कोणातच नाही, ते बदलणे अशक्यच असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्री तसेच रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. ते खेड तालुक्यातील भरणे येथील रिपाइंच्या कोकण मेळाव्यात बोलत होते.
कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे व कोकण युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देणे कधी आठवले नाही, संसदेच्या सेंटर हॉलमध्ये त्यांची प्रतिमा लावण्याची आठवण झाली नाही, सत्ताधारी संविधान बदलू पाहत आहेत, अशा अफवा काँग्रेसकडून पसरवून संभ्रम निर्माण करत आहे. मात्र, संविधानाचा गाभा इतका मजबूत आहे की, तो कोणालाच बदलणे शक्य नाही. तसे झाल्यास आम्ही आमचे प्राण पणाला लावू, असे मंत्री आठवले म्हणाले. ते पुढे म्हणाले की, गेली अनेक वर्षे रखडलेला महामार्ग कोकणच्या विकासासाठी पूर्ण होणे गरजेचे आहे. कोकणातील बेदखल कुळे, गायरान पडीक जमिनी यांचे प्रश्नही सुटणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारने खेडसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्याकरिता जो निधी दिला आहे, यातून आमदार योगेश कदम खेडचा विकास करतील, असा विश्वासही व्यक्त केला.
यावेळी रामदास कदम यांनी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खेड पंचायत समितीचा सभापती हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.