(गणपतीपुळे / वैभव पवार)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली लाडकी म्हणून योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून महिला भगिनींना मिळणारा लाभ आणि महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच आमचे समाधान आहे. त्यामुळे या योजनेत एकही पात्र महिला वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी मालगुंड- गणपतीपुळे येथे दिली. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या गाव भेट कार्यक्रमात ते उपस्थित महिला भगिनींना मार्गदर्शन करताना बोलत होते. मालगुंड भाटलेवठार येथील महालक्ष्मी देवी मंदिरात व गणपतीपुळे केदारवाडी येथे आज बुधवारी २५ सप्टेंबर रोजी लाडकी बहिण योजनेचा गावभेट कार्यक्रम घेण्यात आला.
मंत्री सामंत यांनी महिला भगिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या उन्नतीसाठी आहे. त्यांना सक्षम करणारी आहे.या योजनेचा लाभ महिला भगिनींना व्यवस्थित मिळाला की नाही हे पाहण्यासाठी मी आलो आलो आहे. ही योजना सर्व जात धर्माला घेऊन जाणारी व आर्थिक ताकद देणारी आहे. ही योजना कधीही बंद होणार नाही उलट भविष्यात पंधराशे मध्ये वाढच होईल. तुमच्या खात्यात जमा झालेले पैसे पाहून, तुमच्या चेहऱ्यावरील झालेला आनंद पाहून मला खूप समाधान वाटते. लखपतीदीदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 54 हजार महिलांना लखपती बनवायचे आहे.
या योजनेसह लेक लाडकी, तीर्थदर्शन, वयोश्री या योजनांचा लाभही सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी नामदार सामंत यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतंर्गत मिळणाऱ्या लाभातून अनेक महिलांना आर्थिक उन्नतीसाठी कशाप्रकारे फायदा झाला याची विविध ठिकाणची उदाहरणे त्यांनी दिली. तसेच मालगुंड येथे ही आज आल्यानंतर या ठिकाणी ही एका महिलेने आपल्याला लाडकी बहिण योजनेतील रक्कमेचा लाभ कशाप्रकारे झाला, याविषयी माहिती दिल्याचे आवर्जून सांगतिले. त्यामुळे लाडकी बहिण योजनेतून महिलांनी अधिकाधिक सक्षम व्हावे,असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला विविध खात्यांचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आणि आणि नाम. सामंत यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.