(गणपतीपुळे / वैभव पवार)
ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी यांच्या गुन्हा रजिस्टर मधील सिरीयल नंबर 223/2024 भारतीय न्याय संहिता कलम 305 चोरी मधील आरोपी नितीन बोडके याला गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलिस हवालदार निलेश भागवत आणि ग्रामपंचायत गणपतीपुळे चे सुरक्षारक्षक महेश फडकले आणि ओमकार चव्हाण यांनी अथक प्रयत्न करून गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गणपतीपुळे या ठिकाणी जेरबंद केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी यांच्या गुन्हा रजिस्टरमधील आरोपी नितीन बोडके गेल्या एक महिन्यापासून फरार होता. त्याचा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून ठिकठिकाणी शोध सुरू होता. मात्र तरी देखील तो सापडत नव्हता. मात्र गुरुवारी १६ जानेवारी रोजी त्याचे लोकेशन गणपतीपुळे या ठिकाणी असल्याचे ग्रामीण पोलिसांना दिसून आले.
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलीस हवालदार नितीन भागवत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने संबंधित आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलीस हवालदार निलेश भागवत यांनी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सुरक्षारक्षक महेश फडकले आणि ओमकार चव्हाण यांच्या विशेष सहकार्याने संबंधित आरोपीचा शोध घेतला असता तो गणपतीपुळे या ठिकाणी असल्याचे दिसून आले. यावेळी एका रिक्षा चालकाने त्यांना खबर दिली.
यानंतर त्याला अथक प्रयत्नांनी जेरबंद करून गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलीस हवालदार निलेश भागवत यांनी आरोपी नितीन बोडके याला रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनायक राजवैद्य व अन्य पोलीस सहकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे. गणपतीपुळे पोलिसांच्या वतीने ही भरीव कामगिरी झाल्याबद्दल जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी निलेश भागवत व गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सुरक्षारक्षक यांचे विशेष कौतुक केले आहे.