(रत्नागिरी)
कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे आमदार निरंजन डावखरे यांना पहिल्या पसंतीचे मत द्या. ते सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन विक्रम करणार आहे, असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी व स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला. श्री. डावखरे यांनी ग्रीन स्कूलचा संकल्प जाहीर केला. डावखरे यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद लाभला असून रत्नागिरीत चांगले मताधिक्य प्राप्त होईल, असा विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
ॲड. पटवर्धन म्हणाले की, निरंजन डावखरे हे सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघात विजयी होणार आहेत. पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे हा वारसा डावखरे पुढे नेणार आहेत. निरंजन डावखरे यांच्यामार्फत रत्नागिरीत शैक्षणिक चळवळीला गती मिळाली आहे. आमदार डावखरे यांच्या प्रयत्नांतून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात शेकडो शाळा डिजिटल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा वाचनालयात स्पर्धा परीक्षांसाठी ई-लायब्ररीही लवकरच सुरू होणार आहेत.
रत्नागिरीमधील मतदारांशी डावखरे यांनी व पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला आहे. मतदान करताना घ्यावयाची काळजी, खबरदारी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे. या मतदारसंघातील उमेदवार उच्चशिक्षितही आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवण्याची गरज आहे. त्याकरिता डावखरे मोठे योगदान देतील, असा विश्वास ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार डावखरे यांना पुन्हा निवडून द्यावे, असे आवाहन श्री. पटवर्धन यांनी केले.