(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी-नागपुर महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गावर हातखंबा तिठ्यानजिक घरासमोर मोरी उभारण्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी चांगलेच चर्चेत राहिले होते. येथील ग्रामस्थांच्या घरांना जोडणारे रस्ते बंद करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. प्रोजेक्ट प्लॅन बदलून थेट घरासमोर मोरी उभारण्याला ग्रामस्थांनी विरोध केला होता. याबाबत दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी आपल्या ( NHAI) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला निवेदन सादर केले होते.
त्यानंतर किरण सामंत यांच्या पुढाकाराने NHAI विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत Nhai विभागाचे अनिल सिंग, इंजिनीयर आदींनी ग्रामस्थांनी निर्माण होणाऱ्या समस्यांवर चर्चा केली. यामध्ये स्थानिकांना रस्ते घरासमोरून देणे व पाण्याचा निचरा व्हावा या विषयी चर्चा समाधानकारक झाली. या बैठकीत घरासमोर मोरी करण्याला ग्रामस्थ कांबळे यांनी कडाडून विरोध केला होता. आंदोलनास अधिकाऱ्यांनी प्रवृत्त केल्यास वेळप्रसंगी आंदोलन ही करण्याची भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान मोरीवरूनच (कठडा न करता) रस्ता देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी घरासमोर बंदिस्त गटाराव्दारे पाणी मोरीत सोडणार असेही निर्णय अधिकाऱ्यांनी बैठकीत मान्य केले. ग्रामस्थांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने ग्रामस्थांनी घरासमोरील मोरीचे काम सुरू करण्यास सांगितले. परंतु गेले अनेक दिवसांपासून मोरिचे काम सुरू असून घरांकडे येण्या-जाण्याचे रस्ते काही काळासाठी बंद करण्यात आलेले आहेत. बैठकीत ठरल्यानुसार कोणतेही काम होत नसल्याचा आरोप आता ग्रामस्थ कपिलानंद कांबळे यांनी केला आहे. मातीचा भराव टाकून लेव्हल करणे, बंदिस्त गटार करण्याचे काम सुरू करणे आदी कामे सुरू करणे गरजेचे आहे. मात्र याठिकाणी कोणत्याही कामाचे कोणतेही नियोजन दिसत नाही. एकूणच आता सुरू असलेल्या कामांमुळे संभ्रम निर्माण होत आहे.या सर्व विषयाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला कांबळे यांनी १२ मे २०२४ रोजी निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, या ठिकाणी अधिकारी वर्गाने तातडीने भेट द्यावी. नियोजित काम कशा पद्धतीने करनार आहे याबाबत स्थानिकांना विचारात घेऊन कामे करावी, मोरीचे काम जेवढ्या गतीने व घाईने सुरू आहे मग याठिकाणी ठरल्याप्रमाणे माती भराव टाकण्याचे व बदिंस्त गटाराचे काम का सुरू नाही. केवळ मोरीचेच घाईघाईने काम करून ढोंगीपणा करू नये येत्या दोन दिवसांत याबाबत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा पुढील काम रोखण्यात येईल. व एकही कामगार याठिकाणी फिरकू देणार नाही. असा इशारा गी निवेदनातून देण्यात आला आहे.
मोरीवर कठडा उभारल्यास स्थानिकांचे रस्ते बंद होणार
स्थानिकांना आधीपासून रस्ते बंद होण्याची भीती निर्माण झाली होती. यामुळेच घरासमोर मोरी उभारण्यास कांबळे यांनी विरोध दर्शवला होता. मात्र मोरी उभारून त्यावर कठडा करण्याचे कारस्थान आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने किंवा ठेकेदार कंपनीने रचले तर स्थानिक ग्रामस्थांचे ये-जा करण्याचे हक्काचे रस्ते बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्राधिकरण विभागाने अधिकारी अनिल सिंग यांनी मान्य केलेल्या मागण्यांची पूर्तता करावी लागेल. कांबळे यांनी १२ मे रोजी सादर केलेल्या निवेदनावर प्राधिकरण विभागाने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही.