(दापोली)
दापोली तालुक्यात पवित्र पोर्टलमधून भरती झालेल्या नवनियुक्त शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षक हे उच्चशिक्षित आहेत. तर काही जणांनी सध्या असलेली शासकीय सेवेतील नोकरी आणि व्यवसाय सोडून शिक्षक होणे पसंत केले आहे. शिक्षक पदासाठी बारावी पास आणि डीएड अशी शैक्षणिक अर्हता असतानादेखील उच्चशिक्षित उमेदवारांनी शिक्षकपेशा स्वीकारला आहे. त्यामुळे नोकऱ्यांची गंभीरता स्पष्ट होऊ लागली आहे. सध्या या शिक्षकांना दापोली तालुक्यातील या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पवित्र पोर्टलमधून १४८ शिक्षकांची भरती करण्यात आली. या शिक्षकांना दि. ४ ते १० नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण देण्याचे काम जिल्हाभर सुरू आहे. यातील प्रशिक्षण घेत असलेले काही शिक्षक तलाठी, पोलिस तसेच इतर शासकीय पदावर कार्यरत आहेत. तर काहीजण वकिली तसेच इतर व्यवसाय करीत आहेत. या सर्वांनी शासकीय नोकरी आणि व्यवसाय सोडून शिक्षकीपेशा स्वीकारला आहे. शिक्षक पदासाठी बारावी डीएड अशी शैक्षणिक पात्रता होती, मात्र एम.एसस्सी, एम. ए, नेट सेट, एम. ए. बी. एड. एम. एड, अशा उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी शिक्षकीपेशा निवडला आहे. या शिक्षकांनी नियुक्त होण्यापूर्वीच उच्च शिक्षण घेतल्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे होणार आहे. मध्यंतरी नोकऱ्या मिळत नसल्याने अनेकांनी मोकळ्या वेळेत डीएड, बीएड केले आहे, त्याचा आता या तरुणांना फायदा झाला आहे.
दापोलीतील एन.के.वराडकर काॅलेज केंद्रावर एकूण १४८ शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम सध्या सुरू आहे. शिक्षण क्षेत्रातील नवीन संकल्पना, नवीन संबोध शिक्षकविषयक जबाबदाऱ्या, योजना, अध्ययनशास्त्र, पद्धती, नवीन शैक्षणिक धोरण, २०२० नुसार नवीन अभ्यासातील तंत्रज्ञान, मूल्यमापन पद्धती, विविध शालेय अभिलेख आणि त्याचे जतन कालावधी अशा अनेक बाबींवर प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रशिक्षणासाठी गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख सुनिल कारखेले, श्रीकांत बापट,गटसाधन विषयतज्ञ,प्रकाश फडके,विद्या सार्दळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जात असून गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले. हे शिक्षक गेल्या जून व ऑगस्ट महिन्यामध्ये नवीन वर्षात शिकवण्यासाठी रुजू झाले आहेत. या शिक्षकांचे सेवेपूर्वीच उच्च शिक्षण झाल्याने त्यांना विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकवता येणार आहे.