(चिपळूण / मिलिंद देसाई)
न्यू इंग्लिश स्कूल देवरुखच्या 1988 मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे सहावे स्नेहसंमेलन नुकतेच अपरांत रिसॉर्ट, देवरुख येथे संपन्न झाले. या संमेलनाची सुरवात गणेश गोडबोले यांनी गणेश पूजनाने तसेच विठ्ठल रखुमाई दिंडी आणि रिंगण अश्या भक्तिमय सोहळ्याने झाली. यानंतर माझ्या जीवनातील टर्निंग पॉईंन्ट हा मजेशीर कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी ह.भ. प. मकरंद बुवा मोरे आणि देवयानी खवळे यांचे भजन, संध्याकाळी फनी गेम्स, स्लो सायकलिंग तसेच रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आणि कॅम्प फायर असे कार्यक्रम पहिल्या दिवशी संपन्न झाले.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा जाधवने केले. शिल्पा भिडे, विवेक मुळ्ये, राजू जागूष्टे, वैशाली वेल्हाळ, छाया देसाई, मेधा हरचिरकर, संतोष पेडणेकर, देवयानी शिंदे, शर्मिष्ठा सरपोतदार, सुचिता मोरे आणि इतर कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या.
दुसऱ्या दिवशी जुन्या आठवणीना उजाळा देण्यासाठी काष्ठशिल्प म्युझियम, बुरंबी आणि कर्णेश्वर मंदिर कसबा येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पवार यांनी केले. या संमेलनासाठी चाळीस सदस्य उपस्थित होते. पुढील वर्षी परत एकत्र भेटण्याचे अभिवचन देऊन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.