(रत्नागिरी)
रत्नागिरीतील शिवसेना कार्यकर्ते सिद्धेश शिवलकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश शिवलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला होता. सिद्धेश शिवलकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या शिफारसी नुसार विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळाले.
रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या शिफारशीवरून व खासदार पदाचे दावेदार किरण उर्फ भय्या शेठ सामंत, तसेच शिवसेना नेते सुदेश मयेकर यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याधिकारी रत्नागिरी यांनी सिद्धेश शिवलकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी ( सत्यप्रत/ ATTESTED करण्याचे अधिकार ) म्हणून नियुक्ती ओळखपत्र प्रदान करण्यात आले आहे. सदरचे नियुक्ती पत्र किरण उर्फ भय्या शेठ सामंत आणि माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना सिद्धेश शिवलकर म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकदिलाने काम केले. माझ्यासह अनेक युवकांनी पक्ष मोठा करण्याचे काम केले. महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही सगळ्यांनीच शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोचविण्याचे कार्य केले होते. मात्र आम्हाला पक्षाने विशेष कार्यकारी अधिकारी पद कधीच दिले नव्हते. शासनाच्या अनेक समित्या असतात त्यावर सुद्धा आम्हाला कधी घेण्यात आले नाही. आमच्या कार्याची पक्षाने कधीच दखल घेतली नव्हती. पक्ष वेळोवेळी जबाबदाऱ्या देत असे त्या जबाबदाऱ्या आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत होतो. मात्र आम्हाला न्याय कधी मिळाला नव्हता. मात्र शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांची दखल घेतली जाते. त्याच उदाहरण म्हणजे मला विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळाले. ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.