(रत्नागिरी)
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष व रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव गावचे सुपुत्र कुमार शेट्ये यांचे आज शुक्रवार २७ डिसेंबर रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६४ वर्षे होते.
कुमार शेट्ये यांनी आधी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काम केले. ते रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे, विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. शरद पवार यांची त्यांनी शेवटपर्यंत साथ सोडली नव्हती.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतरही ते शरद पवार गटात कार्यरत होते. प्रत्येक पक्षात त्यांचे चांगले सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर रत्नागिरीतील एका प्रगल्भ राजकारणाचा अस्त झाला अशा भावना व्यक्त होत आहेत. गेले काही दिवस कुमार शेट्ये यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर लोटलीकर हॉस्पिटल येथे गेले काही दिवस उपचार सुरू होते. आज शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले.
एक शांत आणि संयमी नेतृत्व अशीच त्यांची सर्वत्र ओळख होती. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी सर्वांच्या मनात एक आदराचं स्थान निर्माण केले होते. अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला. शिरगाव गावाच्या विकासासाठीही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. काही दिवस ते मुंबईत उपचार घेत होते. त्यानंतर त्यांना रत्नागिरीत दाखल करण्यात आले. रत्नागिरीत उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.