(नाणीज / वार्ताहर)
येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे येत्या रविवारी (२१ जुलै रोजी) गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व थाटात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त याग, निमंत्रण मिरवणुका, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा भव्य गुरुपूजन सोहळा, प्रवचन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक सुंदरगडावर येणार आहेत व आपल्या आवडत्या गुरुप्रती स्नेह, श्रद्धाभाव, पूजन करून दर्शन घेणार आहेत. संस्थानतर्फे उत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
सोहळ्याची सुरुवात शनिवारी, २० जुलै रोजी होत आहे. नैमित्तिक पूजेनंतर सकाळी ८.३० पासून श्री सप्तचिरंजीव महामृत्युंजय यागाने सोहळा सुरू होईल. यावेळी अन्नदान विधीही आहे. सकाळी ११ नंतर मिरवणुकांनी जाऊन देवदेवतांना या सोहळ्याची निमंत्रणे देण्यात येणार आहेत. वाजत गाजत निघणाऱ्या या सर्व मिरवणूका श्री संतशिरोमणी नाथांचे माहेर मंदिरापासून निघणार आहेत. त्यांची जबाबदारी वेगवेगळ्या जिल्हा सेवा समित्यांवर आहे. नाथांचे माहेर येथील उत्तर रायगडकडे, वरद चिंतामणीची सांगली जिल्हा सेवा समितीकडे, प्रभू रामचंद्रांची उत्तर नगरकडे, संतशिरोमणी गजानन महाराज मंदिराची मुंबई समितीकडे आहे.
रविवारी सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. सकाळी ८.३० ते १२ पर्यंत संतपीठावर गुरुपूजन सोहळा आहे. भाविक संतपीठासमोर बसून विधिवत गुरुपूजन करतील. दुपारी चरणदर्शन व अन्य धार्मिक कार्यक्रम आहेत. रात्री ७.३० ला प.पू. कानिफनाथ महाराजांचे अमृतमय प्रवचन होईल. सोहळ्याचा समारोप सर्वांचे आकर्षण असलेल्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या अमृमय प्रवचनाने होणार आहे. दोन्ही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत मोफत आरोग्य शिबीर आहे. २४ तास महाप्रसाद आहे. सोहळ्यासाठी सारा सुदंगड सज्ज आहे.