(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र भि.ग. तथा नानासाहेब गणपतराव विचारे यांचे सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
कै. नानासाहेब विचारे वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. जवळजवळ ३८ वर्षाहून अधिक काळ संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी निष्ठेने भूषवले. आज शिक्षण संस्थेमार्फत माध्यमिक विद्यालय वरवडे, भाग शाळा वाटद- खंडाळा तसेच श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य चालवले जात आहे . कै. नानासाहेब विचारे हे २५ वर्षाहून अधिक काळ वरवडे गावचे सरपंच होते.सरपंच कालखंडात त्यांनी गावातील अनेक मूलभूत सुविधा पूर्णत्वास नेल्या होत्या.
कै. नानासाहेब विचारे महाराष्ट्र शासनाच्या स्वातंत्र्य सैनिक उच्च अधिकार समितीवर त्यांची निवड झाली होती. त्यांनी जिल्हा परिषद सदस्यपदही भूषविले होते. कोळीसरे लक्ष्मी केशव देवस्थानच्या ट्रस्टवरही ते कार्यरत होते. ते थोर शिक्षणप्रेमी,जाणकार आणि कणखर व्यक्तिमत्त्व होते. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करुन ग्रामीण भागात शिक्षण क्रांती घडवून आणली.ते अतिशय प्रेमळ तितकेच कडक शिस्तीचे होते.
त्यांच्या निधनाने शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांसह आजी माजी शिक्षकांनी , शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात डॉ.राजेंद्र विचारे व प्रशांत विचारे हे दोन मुलगे तसेच स्मिता सुर्वे व निता शिर्के या दोन मुली, नातवंडे, सूना असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने गावाची तसेच शिक्षण संस्थेची मोठी हानी झाल्याचे बोलले जात आहे.